पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे आश्वासन
पणजी : हॉटेल व्यावसायिकांनी डेटा ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे पर्यटक किती आले, किती गेले याची माहिती समजू शकते. राज्यात 35 विभागांच्या 227 सेवा ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत. पर्यटनक्षेत्र पुढे नेण्याची सध्या गरज असून, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे हे महत्त्वाचे काम आहे. लवकरच शॅक्स धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल मंगळवारी विधानसभागृहात दिले. विरोधकांच्या कपात सूचना फेटाळताना मंत्री खंवटे म्हणाले की, शॅक्सचा मॉडेल आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत. किनारी भागात वेगवेगळे शॅक्स पहायला मिळतात. वॉटर स्पोर्ट्स आणि शॅक्स हे व्यवसाय गोंयकारांकडेच राहतील. उत्तर व दक्षिण जिल्ह्यात शॅक्सचे स्वतंत्र मॉडेल निरीक्षणासाठी ठेवले जातील.
किनारे स्वच्छता योजनेत भ्रष्टाचार
किनारे स्वच्छता योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई व युरी आलेमाव यांनी केला होता. यावर मंत्री खंवटे यांनी सांगितले की, 2019 साली पुढच्या 5 वर्षांसाठी 34.18 कोटींचे किनारे स्वच्छतेसाठीचे कंत्राट बंगळुरूच्या कंत्राटदारास दिले होते. 42 वॉर्डन आणि 2 तालुका पर्यवेक्षक त्यासाठी आहेत. किनारे स्वच्छ झाले आहेत की नाही हे त्यांना पहावे लागते. 37 किनारे तसेच हरवळे आणि दूधसागर धबधबा अशी ठिकाणे त्यांच्याकडे आहेत.
गोव्याला दर्जात्मक पर्यटकांची गरज
कोरोना संकटामुळे देशी व विदेशी पर्यटकांची संख्या घटली. 2019 मध्ये 7 लाख 12 हजार देशी पर्यटक आणि 9 लाख 35 हजार विदेशी पर्यटक आल्याची नोंद आहे. 2020-21 मध्ये देशी पर्यटक संख्या 26 हजारांनी कमी झाली. परदेशी पर्यटकसंख्या 3 लाखांवर आली. 2021-22 मध्ये मात्र यात वाढ होऊन देशी पर्यटकांची संख्या 33 लाख 8 हजारांवर पोहोचली, तर 21 हजारांपर्यंत विदेशी पर्यटकसंख्या खाली आली. दर्जात्मक पर्यटकांची राज्याला गरज असून, त्या दृष्टीकोनातूनच सरकारचे प्रयत्न आहेत, असे खंवटे यांनी पुढे सांगितले.
राज्याला शंभर कोटीचा छपाई खर्च
विरोधकांनी प्रिंटिंग अॅण्ड स्टेशनरी या विभागाच्या कार्यपद्धतीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री खंवटे म्हणाले, प्रिंटिंग अॅण्ड स्टेशनरी विभागाला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. तरीही अद्ययावतीकरणाबरोबर ही यंत्रणा दुस्रया ठिकाणी नेणे आवश्यक आहे. पोर्तुगीजकालीन छपाई मशिन आहे, ती म्युझियममध्ये ठेवणे आवश्यक आहे. ई-गॅझेटचे काम गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडतर्फे नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. ई-गॅझेट सुरू झाल्यानंतर सबक्रिशन सुरू होईल. 100 कोटींपर्यंत छपाईचा खर्च होत आहे, त्यामुळे तो एकाच खात्याकडून व्हावा, असे आपणास वाटते, असेही ते म्हणाले. पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि प्रिंटिंग अॅण्ड स्टेशनरीविषयक मागण्या सरकार पक्षाकडून बहुमताने मंजूर करण्यात आल्या. सागरमाला पर्यटनाचा भाग आहे. त्यामुळे नदी पर्यटनसाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बंदर कप्तान खात्यातर्फे बांधण्यात आलेल्या जेटी आता कमकुवत बनल्याने त्या पुन्हा बांधण्याची गरज आहे. त्या जर उत्तम स्थितीत नसतील तर त्याचा सागरमाला पर्यटनाला फटका बसणार आहे, असे खंवटे यांनी सांगितले.
स्वदेश धोरण 2.0 राबविणार
स्वदेश धोरण 2.0 हे कोलवा किनाऱ्यावर राबविले जाणार असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल. त्यासाठी केंद्राकडून 72 कोटी ऊपये मंजूर झाले आहेत. ग्रामीण पर्यटन पर्वरी, हळदोणा आणि हरवळे येथे राबविले जाईल. ‘गोवा हाट’चा शुभारंभ लवकरच होईल. त्यासाठी पणजीजवळील जागा लवकरच निश्चित केली जाईल, असे खंवटे म्हणाले.









