नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन काळात सर्व तऱहेचे लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर मर्यादा आल्या होत्या. एकत्र जमण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे मार्च, एप्रिल, मे या लग्नसराईच्या हंगामात अनेक विवाह पुढे ढकलावे लागले. आता सरकारने विवाह समारंभ करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यासाठी काही नियम घातले आहेत. त्यानुसार 50 हून अधिक व्यक्तींना विवाह समारंभात सहभागी होता येणार नाही, ही महत्त्वाची अट आहे.
असे आहेत नियम
सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीनुसार
1) विवाह किंवा तत्सम समारंभासाठी प्रशासनाकडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
2) स्थानिक प्रशासनाकडून प्रवासी पास घ्यावा लागेल
3) समारंभात फक्त 50 व्यक्तींना सहभागी होता येईल.
4) पोषक वातावरण, खेळती हवा असणे आवश्यक.
5) प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीला सहभागी होता येणार नाही
6) 65 वर्षांवरील वृद्ध, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुलांना सहभागी होता येणार नाही
7) प्रवेशद्वारापाशी सॅनिटायझरची सुविधा ठेवावी लागेल
8) येणाऱया प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल
9) एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान 99.5 असेल, त्याला ताप असेल, सर्दी, खोकला असेल, श्वास घेताना त्रास होत असेल त्याला समारंभात सहभागी होता येणार नाही.
10) समारंभातील प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक आहे
11) सर्व व्यक्तींमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे
12) स्वच्छतागृहात हॅन्डवॉश आणि साबण ठेवावाच लागेल
13) मद्य, पान, गुटखा, तंबाखू यांचा वापर करता येणार नाही
14) सार्वजनिक ठिकाणी थुंकता कामा नये
15) समारंभाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे नोडल अधिकारी असेल
16) जे लोक समारंभास उपस्थित राहणार आहेत, त्यांचा पूर्ण तपशील देणे बंधनकारक राहणार आहे.
17) येणाऱया पाहुण्यांनी गुगलवरून आरोग्य सेतु ऍप डॉऊनलोड करून नेंदणी करावी लागेल









