गोवा, सिंधुदुर्गातून रोज 100 गाडय़ांची वाहतूक : दीड महिना पूर्णपणे वाहतूक ठप्प
सुभाष मोरजकर / कडावल:
कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने 21 मार्च पासून राज्यात लॉकडाऊन केले. त्यामुळे राज्यभर दळण-वळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा फटका ऐन मोसमामध्ये टॅक्सी, लक्झरी बस, रिक्षा चालक, मालक, संघटनांना बसला आहे. गोवा व सिंधुदुर्ग जिल्हय़ातून रोज 100 लक्झरी बसची ये-जा सुरू असते. ती गेले 50 दिवस पूर्णपणे बंद असल्याने बस मालकांना जवळपास सुमारे 25 कोटींचा फटका बसला आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यात वाढताच रेल्वे, एस. टी., ट्रव्हल्स बस व टॅक्सी, रिक्षा बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे तेव्हापासून रात्रंदिवस रस्त्यावर धावणाऱया गाडय़ा जेथे पोहचल्या तेथेच थांबून उभ्या आहेत. वर्षभरात या गाडय़ांना गणेश चतुर्थी व मे महिन्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवासी वाहतुकीतून नफा मिळतो. वर्षभर थकित असलेले कर्ज फेडणेही यावेळी थोडे-फार शक्य होते. सिंधुदुर्गात सुमारे 50 लक्झरी एजंट कमिशनच्या माध्यमातून आपली कुटुंबे चालवून उदरनिर्वाह करतात.
लक्झरी बस 22 मार्चनंतर जेथे पोहोचल्या, तेथेच त्या उभ्या आहेत. गाडय़ांवर असणारे चालक, वाहक बसच्या सुरक्षिततेसाठी थांबून आहेत. गाडय़ा मार्गावर फिरत नसल्याने मालकांना कोणतेही उत्पन्न मिळत नाही. तरीसुद्धा त्या कर्मचाऱयांना तुटपुंजे मानधन देऊन गाडय़ांची देखभाल करावी लागते. प्रत्येक बसवर दोन ड्रायव्हर व एक व पिकअपमॅन असे चार कर्मचारी असतात. बंद गाडय़ांमुळे व अपुऱया पगारांमुळे या कर्मचाऱयांचे जगणे मुश्किल झाले आहे. तर काही गाडी मालक ड्रायव्हर टिकून राहावा म्हणून महिन्याचा पगार नियमित देतात.
लॉकडाऊनमुळे बहुसंख्य चालक बस थांबवून तिथेच दिड महिना अडकून आहेत. त्यांना घरच्यांची ओढ लागली असून दळणवळण पूर्ण ठप्प असल्याने बसपासून दुसऱया गावी जाण्यासाठी वाहतूकीची सोय उपलब्ध नाही. यातील बहुसंख्य ड्रायव्हर हे गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे येथील, तर काही परराज्यातील असून गेले दोन महिने त्यांना लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी जाता आलेले नाही. त्यांना उदरनिर्वाहासाठी पुरेसा पैसाही पाठवता येत नाही. उन्हाळी, पावसाळी शेतीकडे लक्ष देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग ते पुणे, मुंबई अशा बसच्या एका ट्रिपला डिझेल खर्च 22 हजार एवढा येतो. या व्यतिरिक्त टायर झीज, इंजिन काम, परमीट टॅक्स, कर्मचारी पगार असा दर दिवशीचा खर्च आहे. कमी हंगामात एका ट्रिपला सुमारे 7-8 हजार रुपये मिळतात तर अनेक वेळा 10-15 सीट घेऊन गाडय़ा मार्गस्थ होतात. गेले दोन महिने सर्व गाडय़ा जाग्यावर उभ्या असून चाके थांबल्याने बँकेचे कर्ज हफ्ते व्याज, टॅक्स पोटी लाखो रुपयांचे नुकसान गाडी मालकांना सोसावे लागत आहे. यातून मालकांना पूर्व पदावर यायला किमान पुढची तीन वर्षे घालवावी लागतील, असे गाडी मालकांचे म्हणणे आहे.
सिंधुदुर्गातील ट्रव्हल्स व्यवसायातील व त्यावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आज उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसत असून ऐन सिझनमधील हा व्यवसाय कोलमडल्याने पूर्ण पदावर येण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगता येत नाही. आतापर्यंत सुमारे 25-30 कोटीचा व्यवसाय गमावला असला, तरी दररोज लागणारा आर. टी. ओ., रोड टॅक्स, इन्शुरन्स, बँक कर्ज, हफ्ते, व्याज, रक्कम गाडी मालकांना भरावी लागणार, असे गाडी मालकांचे म्हणणे आहे. नाहीतर गाडय़ांचे लिलावही केले जाईल, अशी भीती कायम असून इतरांना केंद्र व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सवलतीप्रमाणे रिक्षा ट्रव्हल्स चालक मालक एजंट यांना देखील सूट जाहीर करावी, ही विविध संघटनांची आग्रहाची मागणी आहे.
ट्रव्हल्स, टॅक्सी, रिक्षा यांची मोठी इंडस्ट्रीज असून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. विविध संघटना याचा विचार-विनिमय करीत असून मालक एजन्ट ठिकठिकाणी विखुरलेले असून लॉकडाऊनमुळे बैठका घेणे, सह्यांचे निवेदन देणे, जिल्हाधिकाऱयांची संघटित भेट घेणे शक्य होत नसल्याने शासनाने गंभीरपणे याची दखल घ्यावी, अशीही मागणी होत आहे.
लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला आहे. ऐन सिझनला खासगी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प असून शासनाने तीन महिन्यांसाठी रोड, टॅक्स, इन्शुरन्स, बँक हप्ता, व्याज दरामध्ये सूट द्यावी. बस मालक एजंट अडचणीत असून शासनाने इतर लोकांना जाहीर केल्याप्रमाणे सवलती आम्हाला द्याव्यात, अशी विनंती आहे.









