प्रतिनिधी /पेडणे
शिरगाव येथे सुप्रसिद्ध असलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवासाठी पेडणे तालुक्मयात धोंडगणांकडून सोवळे व्रताला सुरुवात झाली आहे. येथून हजारो धोंडगण जत्रोत्सवात सहभागी होणार आहेत.
पेडणे तालुक्मयात बहुताश गावातील मंदिरात तसेच मंडप उभारून रविवारपासून धोंडगणांनी लईराईदेवीच्या व्रताला प्रारंभ केला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे धोंडगणांना जत्रोत्सवात सहभाग घेता आला नाही. मात्र यंदा जत्रोत्सव साजरा होणार असून यात लाखो भाविक सहभागी होणार आहेत.
पेडणे तालुक्मयातील कोरगाव, धारगळ, पार्से, हरमल, केरी, तुये, पेडणे पालिका क्षेत्र, पोरस्कडे, खुटवळ, इब्रामपूर, चांदेल, हसापूर कासारवर्णे, तोरसे, उगवे, मांदे आदी गावात हे धोंडगणांकडून सोवळे व्रत केले जाते. धोंडगणांसाठी शिरगावची जत्रा म्हणजे पंढरीची वारी असल्याचा अनुभव येतो, असे राजेंद्र नाईक म्हणाले.
40 वर्षे सोवळे व्रत करणारे हिरु गणेश पंडित
श्री देवी ब्राह्मणी मंदिरात गेली अनेक वर्षे मोठय़ा संख्येने धोंडगण सोवळे व्रत धरतात. यात गेली सलग 40 वर्षे आपण लईराई देवीचे सोवळे व्रत करत असल्याचे खुटवळ पेडणे येथील हिरु गणेश पंडित यांनी सांगितले. आपले वडीलही धोंड होते, त्यानंतर आपण हे व्रत सुरू केले. आपला मुलगाही आता हे व्रत करत असून एक महिना आम्ही अंडी तसेच अन्य मासांहार करत नसल्याचे त्यांनी सांगितले. खुठवळ येथील श्री ब्राह्मणी मंदिर सभामंडपात यंदा 48 धोंडगण सोवळे व्रत धरत असल्याची माहिती विशाल नाईक यांनी दिली.
आज व्हेडले जेवण
बुधवारी रात्री धोंडगण ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते म्हामने म्हणजेच व्हडले जेवण वाढतात. यावेळी वाडय़ावरील तसेच आसपास परिसरातील धोंडगणांचे नातेवाईक तसेच इतर नागारिक धोंडगणांनी बानविलेले खास जेवण हा प्रसाद म्हणून घेण्यासाठी येतात. गुरुवारी सकाळी हे धोंडगण शिरगावला जत्रोत्सवासाठी रवाना होणार आहेत.









