प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात कोरोना संसर्ग सद्या नियंत्रणात आला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱया रूग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलच्या अनेक कर्मचाऱयांनी नाताळ सण व वर्ष अखेरीस रजा घेतली होती. परंतु ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यत 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, जे कर्मचारी रजेवर गेले होते, त्यांच्या रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या जीवघेण्या विषाणुमुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवाच बंद केली आहे. भारतात आणि गोव्यातही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहेत.
ब्रिटनहून गोव्यात आलेत 900 जण
गोव्यात 8 डिसेंबरनंतर ब्रिटनहून 900 प्रवासी आले आहेत. यातील 400 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत त्यातील 16 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या 16 जणांना मडगावच्या ईएसआय कोविड हॉस्पिटलात दाखल करून घेण्यात आले आहे.
पुण्यात पाठविलेल्या नमून्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली असून सद्या 16 जणांचे नमूने पुण्यात पाठवून दिले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर या 16 जणांना ब्रिटनमध्ये आढळलेलेल्या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा संसर्ग झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे. सद्या पुण्यातील अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
रजेवर गेलेल्या कर्मचाऱयांची रजा रद्द
नाताळ व वर्ष अखेरीस ईएसआय कोविड हॉस्पिटलचे अनेक कर्मचारी रजेवर गेले होते. परंतु, ब्रिटनहून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर व त्यांना ईएसआय कोविड हॉस्पिटलात भरती करण्यात आल्याने ईएसआय हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी ज्या कर्मचाऱयांनी रजा घेतली होती, ती रद्द करण्यात आल्याची नोटीस जारी केली असून रजेवर गेलेल्या कर्मचाऱयांनी पुन्हा डय़ुटीवर रूजू व्हावे असे कळविले आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने, कर्मचाऱयांना आपल्या रजेला मुकावले लागल्याने, ईएसआय कोविड हॉस्पिटलच्या कर्मचाऱयांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. गोव्यात कोरोना नियंत्रणात आल्याने तसेच हॉस्पिटलात भरती होणाऱया रूग्णांची संख्या कमालीची घटनल्याने अनेक कर्मचाऱयांनी रजेवर जाणे पसंत केले होते.
दरम्यान, गोव्यात कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने ईएसआय हॉस्पिटलमधील बरीच सामुग्री स्थलांतरित करण्यात आली होती. ती पुन्हा आणणे भाग पडले आहे. त्यात मास्क सहीत बऱयाच गोष्टीचा समावेश होता. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने, येथील कर्मचारी सद्या सतर्क झाले आहेत.









