वृत्तसंस्था/ लंडन
सादिक खान हे लंडनचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. त्यांना या निवडणुकीत 55 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. सादिक यांचा दुसरा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. मजूर पक्षाचे नेते असलेल्या सादिक यांनी हुजूर पक्षाचे उमेदवार शॉन बेली यांचा पराभव केला आहे.
पाकिस्तानी वंशाचे सादिक हे 2016 मध्ये युरोपीय शहराचे महापौरपद मिळविणारे पहिले मुस्लीम ठरले होते. लंडनमधील सर्व नागरिकांसाठी काम करणार आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन सुधारावे याकरता प्रयत्न करणार असल्याच्या प्रतिज्ञेचा खान यांनी विजयानंतर पुनरुच्चार केला आहे.
सादिक खान यांच्या विजयामुळे ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाला दिलासा मिळाला आहे. लंडन विधानसभेत यामुळे मजूर पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. तसेच ग्रेटर मँचेस्टर येथेही मजूर पक्षाचे अँडी बर्नहॅम यांनी महापौरपद राखले आहे.
तर हुजूर पक्षाने 12 कौन्सिल्सच्या सत्तेवर नियंत्रण मिळविले आहे. वेस्ट मिडलँड्सचे हुजूर पक्षाचे महापौर अँडी स्ट्रीट यांना पराभूत करण्याचे मजूर पक्षाचे स्वप्न भंगले आहे. सेर कियर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने ही निवडणूक लढविली होती. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवानंतर जेरेमी कॉर्बिन यांनी पक्षाचे नेतृत्व सोडले होते.









