वृत्तसंस्था/ कोलंबो
आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी मंडळाने लंकेचा माजी क्रिकेटपटू झोयसा याला दोषी ठरविले आहे. 2018 साली संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या टी-20 लिग स्पर्धेत झोयसाकडून मॅचफिक्सिंग तसेच आर्थिक भ्रष्टाचार झाला होता. आयसीसीच्या स्वतंत्र चौकशी लवादाने झोयसाला दोषी ठरविले. पण आपल्याविरुद्ध हे खोटे आरोप करण्यात आले असून झोयसाने या आरोपांचा इन्कार केला आहे.
आयसीसीतर्फे या प्रकरणाची चौकशी करण्याकरता स्वतंत्र लवादाची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी या लवादासमोर सुनावणी झाली आणि झोयसावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्याला दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वी मॅचफिक्सिंगच्या आरोपाखाली झोयसावर हंगामी स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या सुनावणीवेळी आपण मॅचफिक्सिंग आणि आर्थिक भ्रष्टाचार केल्याची कबुली दिली नसतानाही आयसीसीने मला दोषी ठरविले, असे 42 वषीय झोयसाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी आयसीसीच्या चौकशी लवादाकडून दिशाभूल करणारी विधाने प्रसिद्ध झाली आहेत. या लवादाचे कामकाज चुकीच्या मार्गाने जात असल्याचे झोयसाने म्हटले आहे. 2019 च्या मे महिन्यात झोयसावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मध्यंतरी झोयसाची लंकन संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण आयसीसीच्या या निकालामुळे झोयसाची प्रशिक्षक कारकीर्द धोक्मयात येण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. झोयसाने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 30 कसोटी आणि 95 वन डे सामन्यात लंकेचे प्रतिनिधित्व केले होते. 1999 साली हरारेत झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटीत झोयसाने हॅटट्रिक नोंदविली होती.









