वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक जाँटी ऱहोड्सवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दुहेरी जबाबदारी सोपविली आहे. ऱहोड्स आता पंजाब संघाचा फलंदाज आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका वठविणार आहे.
52 वर्षीय जाँटी ऱहोड्स पंजाब संघाचे यापूर्वी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. आता त्यांच्यावर फलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे. यापूर्वी पंजाब संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून वासिम जाफर होते. त्यांनी हे पद सोडल्याने ऱहोड्सकडे ही जबाबदारी पंजाब संघाच्या फ्रांच्यायजीनी सोपविली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि माजी प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळे पंजाब संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या ऱहोड्सने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 52 कसोटीत 2532 धावा तर 245 वनडे सामन्यांत 5935 धावा जमविल्या आहेत. पंजाब संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही.
2022 च्या आयपीएल स्पर्धेसाठी पंजाब संघाने शिखर धवन, शाहरूख खान लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, रबाडा आणि 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱया राज बावाला क्रिकेटपटूंच्या लिलावात खरेदी केले आहे. मयांक अगरवाल आणि अर्षदीप सिंग यांचे संघातील स्थान कायम राहिले असून लवकरच कर्णधारांची घोषणा केली जाईल.









