वृत्तसंस्था/ दुबई
विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात सोमवारी आयपीएलमधील साखळी सामना होणार असून रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यात कोण सरस ठरणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबईची कामगिरी सरस होण्याची अपेक्षा आहे. आरसीबीची वेगवान गोलंदाजीची बाजू काहीशी कमकुवत असून या सामन्यात ही बाजू भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सायंकाळी 7.30 पासून हा सामना सुरू होणार आहे.
आरसीबीने या मोसमाची विजयाने सुरुवात केली. पण स्टार्सचा भरणा असलेला हा संघ किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध कोलमडला आणि 97 धावांनी त्यांना नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार कोहलीने दोन डावात 14 व एक धाव केली असून त्याच्याकडून मोठी खेळी होण्याची अपेक्षा आहे. शानदार अर्धशतकाने आयपीएलमध्ये पदार्पण करणारा देवदत्त पडिक्कल पंजाबविरुद्ध मात्र फारसे योगदान देऊ शकला नाही. आपल्या खेळात सातत्य राखण्यासाठी तोही या सामन्यात प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंचने दोन्ही सामन्यात चांगली सुरुवात केली. पण त्याला त्याचे मॅचविनिंग कामगिरीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एबी डीव्हिलियर्स चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसून आल्याने अखेरच्या टप्प्यात त्याच्याकडून आतषबाजीची अपेक्षा करता येईल. पण खालच्या क्रमांकावरील फलंदाजांकडून फारशी आशा करता येणार नाही, अशी त्यांची कामगिरी झालेली आहे.
पहिल्या दोन सामन्यात द.आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसला दुखापतीमुळे संघात घेण्यात आले नव्हते. पण या सामन्यात त्याचा समावेश करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल हाच आरसीबीचा भरवशाचा गोलंदाज आहे. नवदीप सैनीचा अपवाद वगळता इतर जलद गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या आहेत. डेल स्टीन व उमेश यादव दोघेही आतापर्यंत खूप महागडे ठरले आहेत. स्टीन आपले स्थान राखेल, पण यादवबाबत तसे म्हणता येणार नाही. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. अष्टपैलू मोईन अलीला सामील केल्यास आरसीबीची मध्यफळी मजबूत होईल. पण जोश फिलिप यष्टिरक्षणाचे काम करीत असल्याने मोईनला फक्त स्टीनच्या जागीच स्थान मिळू शकते.
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर सर्वच आघाडय़ांत मात करून शानदार विजय मिळविला असल्याने ते संघात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. कर्णधार रोहित शर्माला गवसलेला फॉर्म ही त्यांची मोठी जमेची बाजू असून सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली आहे. फक्त सौरभ तिवारीच्या जागी इशान किशनला घेतले जाऊ शकते.
हार्दिक पंडय़ा, पोलार्ड हे अष्टपैलू असल्याने फलंदाजीप्रमाणे जादा गोलंदाजाचे कामही ते करू शकतात. मात्र पाठदुखीच्या दीर्घ ब्रेकनंतर खेळत असल्याने हार्दिकला इतक्यातच गोलंदाजी देण्याचा धोका पत्करणार नसल्याचे मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्पष्ट केले आहे. चेन्नईविरुद्ध निष्प्रभ ठरलेल्या बुमराहने पुन्हा लय मिळविली असून तोच त्यांचा वेगवान माऱयाची आघाडी सांभाळेल.
@मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
@आरसीबी : कोहली (कर्णधार), फिंच, पडिक्कल, पार्थिव पटेल, डीव्हिलियर्स, गुरकीरत सिंग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सैनी, स्टीन, चहल, झाम्पा, उदाना, मोईन अली, जोश फिलिप, नेगी, पवन देशपांडे, सिराज, उमेश यादव. सामन्याची वेळ : सायं. 7.20 पासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.









