आर. माधवनचा चित्रपट : शाहरुख खान दिसणार विशेष भूमिकेत
अभिनेता आर. माधवन स्वतःचा बहुप्रतीक्षित दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ‘रॉकेट्री ः द नंबी इफेक्ट’वरून अत्यंत उत्साही आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने पूर्वीच मोठा प्रतिसाद मिळविला आहे. माधवनचा हा चित्रपट 1 एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटामध्ये सिमरन, रजत कपूर, रवि राघवेंद्र, मिशा घोषाल, गुलशन ग्रोव्हर, कार्तिक कुमार आणि दिनेश प्रभाकर यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काही आंतरराष्ट्रीय अभिनेतेही दिसून येतील. यात फीलिस लोगन, विंसेंट रिओटा आणि रॉन डोनाइचे यांचा समावेश आहे. याचबरोबर शाहरुख खान आणि सूर्या हे देखील काही दृश्यांमध्ये दिसून येणार आहेत.
भारतीय वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. नंबी नारायणन हे इस्रोचे माजी वैज्ञानिक आणि एअरोस्पेस इंजिनियर होते, त्यांना हेरगिरीच्या खोटय़ा आरोपांमध्ये अटक करण्यात आली होती. चित्रपटाचे चित्रिकरण भारतासह फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया, सर्बिया आणि रशिया येथे पार पडले आहे.









