प्रतिनिधी/गगनबावडा
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या काळात अख्खा ओढाच शेताशिवारात शिरल्याने शेतीपिके उध्वस्त झाली आहेत . नुकसानीची पाहणी करुन भरपाई मिळावी अशी मागणी गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांच्याकडे संबंधित शेतकऱ्यानी केली आहे.
मंगळवारी दि ४ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामूळे सैतवडे पैकी रेव्याचीवाडी (ता. गगनबावडा) येथे म्हारकीचा ओढा दुथडी भरुन वाहत होता. पाण्याचे प्रमाण वाढल्याने मार्गच बदलला. संपूर्ण पाणी शिवारात शिरल्याने धुप होऊन भात, नाचणी, ऊस इत्यादी पिके वाहून गेली. दगड, माती, झाडे वाहून आल्याने पिके गाडली गेली.चा एकर क्षेत्रातील पिकांची नासधुस झाली आहे.
खरीप पिके गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गगनबावडा क्रृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी वर्गास दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन तहसिलदार संगमेश कोडे यांना दिले. यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य मनोहर बोरये, सुरेश प्रभू, पांडूरंग वरेकर, बापू बोरये, क्रृष्णा वरेकर, आनंदा वरेकर, मंगेश प्रभू इत्यादी शेतकरी उपस्थित होते.