तैपेई / वृत्तसंस्था
तैवानच्या पूर्व भागात रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात 48 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त रेल्वे तैटुंगच्या दिशेने जात असताना बोगद्याजवळ एक ट्रक रेल्वे रुळावर पडल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघातावेळी 350 प्रवासी रेल्वेमधून प्रवास करत होते. रेल्वे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. हा अपघात बोगद्यात झाल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव दलाने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. या दुर्घटनेमुळे तैवानमधील टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हलच्या आनंदावर परिणाम झालेला दिसून येत आहे. सध्या तैवानमध्ये टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हल सुरू असल्याने येथील नागरिक सुट्टीचा आनंद घेत होते. सुट्टीनिमित्त अनेक तैवानी नागरिक रेल्वे आणि बसने प्रवास करत होते.








