लोंढा ते मिरजदरम्यान दुपदरीकरण सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
लोंढा ते मिरज या दोन रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असा अंदाज आहे. बेळगाव ते देसूर या 10 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याने लोंढा ते मिरजदरम्यान 56 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे.
रेल्वेची गती वाढावी व प्रवासाचा वेळ कमी व्हावा, या उद्देशाने रेल्वेकडून मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे. बेळगाव विभागात खानापूरनजीक घनदाट जंगल असल्याने रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. बेळगाव ते मिरज या दरम्यानचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेमार्गावर माती टाकणे, त्यानंतर खडीकरण करणे असे काम करण्यात येत आहे.
लोंढा ते मिरज या 186 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 56 कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले आहे. बेळगाव ते देसूर, चिकोडी रोड ते घटप्रभा, चिकोडी रोड ते रायबाग, सुलधाळ ते घटप्रभा या मार्गांचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. उर्वरित काम सुरू ठेवण्यात आले आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक यंत्रणा
देसूर ते बेळगाव रेल्वेस्थानकांदरम्यान दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंटरलॉकिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.









