भारतीय रेल्वेत कधीकाळी लालुप्रसाद यादव यांच्या व्यवस्थापनाचे कौतुक व्हायचे. अगदी देशातील मान्यवर मॅनेजमेंट संस्थांनी लालूंना आपल्या या कामगिरीसाठी त्यांना भाषणाला निमंत्रित केले होते. रेल्वेमंत्री पदावरून लालूप्रसाद पायउतार झाले आणि ते कौतुकसुद्धा लुप्त झाले. नंतर रेल्वेचे खरे रूप जगासमोर येऊ लागले. अलीकडे तर रेल्वेतील कंत्राटे लालूप्रसाद यांनी आपल्या नातेवाईकात कशी वाटली याची चर्चा सुरू झाली आणि सीबीआयच्या अधिकाऱयांना एक काम सुद्धा मिळाले! सध्या भारतीय रेल्वे नवभारत घडवणाऱया नेत्यांच्या तंत्राने धावत आहे. अर्थात कोरोना काळात किंवा कोणत्याही आपत्तीच्या काळात रेल्वेने केलेले कार्य देशासाठी खूपच महत्त्वाचे होते यात शंकाच नाही. त्यामुळे रेल्वे नेमकी कोणती घोषणा करते याकडे माध्यमांचे सुद्धा लक्ष लागून असते. दोनच दिवसांपूर्वी रेल्वेने आपल्या ट्विटर अकाउंटवरून काही छायाचित्रे जारी केली आणि त्यामध्ये भारताने जगातील एकमेव लाईफ लाईन रेल्वे सेवा सुरू केली असून त्यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह पाच ऑपरेशन टेबल आणि सर्व सुविधा आहेत. सध्या ही रेल्वे आसामच्या बदरपूर स्थानकामध्ये असून पुढचे काही दिवस तेथे गंभीर आजारी रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया होणार असल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले. माध्यमांनी ही बातमी चांगलीच उचलून धरली. अर्थात ती बातमी होतीही तशीच! पण हे सर्व करताना लाईफ लाईन रेल्वेचा इतिहास भारतात कोणालाही माहीत नसेल असे रेल्वेला किंवा रेल्वेच्या सध्याचा अधिकाऱयांना वाटले असावे. जाहीर केलेल्या बातमीमध्ये खोटे काही नव्हते पण ही माहिती म्हणजे पूर्ण सत्य नव्हते! रेल्वेच्या अधिकाऱयांनी चित्रपट दिग्दर्शक जशी सिनेमॅटिक लिबर्टी घेतात तशीच लिबर्टी घेत सरकारला गरजेचे कथानक जाहीर केले. संकटकाळात सातत्याने निराशाजनक वृत्त प्रसारित होत असताना नव्या वर्षाच्या निमित्ताने सकारात्मक देण्याचा त्यांचा प्रयत्नही असावा. त्यामुळे रेल्वेचा इतिहास पुसला जाणार नसला तरी आपल्याच कर्तबगारीचा पूर्ण विसर पडल्याचे स्पष्ट होणार, चौकस बुद्धीचे भारतीय अधिक माहिती घेणार की नाही याचा विचार ना रेल्वेने केला ना देशभरातील मान्यवर माध्यमांनी. लाईफ लाईन रेल्वे किंवा जीवनरेखा म्हणून प्रसिद्ध असणारी ही रेल्वे जुलै 1991 सालापासून दोन सुसज्ज ऑपरेशन थिएटरसह भारतात कार्यरत आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात ही रेल्वे सुरू झाली असली तरी तिच्या उद्घाटनाच्या एक महिना आधीच राव त्या पदावर विराजमान झाले होते. याचा अर्थ हे काम व्ही. पी. सिंग किंवा त्यांच्या पूर्वी राजीव गांधी यांच्या काळात सुरू झाले असावे. लाईफ लाईन ‘एक्सप्रेस’ असली तरी याला मंजुरी देण्याचे आणि प्रत्यक्षात उतरवण्याचे सरकारी काम ‘गरीब रथाच्या’ गतीने चालते. त्याची गतीही इतिहासजमा झालेल्या बार्शी लाईट अर्थात देवाची गाडी नावाने प्रसिद्ध असणाऱया पंढरपूर यात्रेच्या रेल्वेच्या गतीची असते. देशातील दुर्गम भागात आरोग्य सेवा पोचवण्याच्या हेतूने ही अत्याधुनिक रेल्वे निर्माण करण्यात आली. 30 वर्षे दुर्गम भागात किमान दोन महिने ही गाडी रेल्वे स्थानकावर थांबून वृद्ध लहान मुले आणि अतिगंभीर रुग्णांची शल्य चिकित्सा आणि उपचार करत आली आहे. 2007 साली रेल्वेने अधिक सुधारणा केली. कर्करोग, अपंगासाठीचे उपचार, हाडांच्या शस्त्रक्रिया, मोतीबिंदु शस्त्रक्रिया, बहिरेपणावर शस्त्रक्रिया अशा अनेक सुविधा यात वाढवण्यात आल्या. राव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये यामध्ये काही ना काही सुधारणा होत गेल्या. मुंबईतील एक खाजगी बालरोग तज्ञ या सेवेत जोडले गेले. एका अपंग बालिकेच्या भविष्याची तिच्या पित्याला चिंता होती. रेल्वेतील उपचारानंतर मुलगी सामान्य माणसांप्रमाणे चालू लागली तेव्हा दुर्गम भागातील त्या पित्याने आपल्या मुलीच्या विवाहाला संबंधित डॉक्टरांना शोधून निमंत्रण दिले. कधीकाळी लाईफ लाईनबाबतची ही बातमीसुद्धा चर्चेचा विषय ठरली होती. याच लाइफ लाईन रेल्वेच्या प्रयोगातून कोरोना काळात फिरती रुग्णालये आणि अलगीकरण कक्ष रेल्वेच्या डब्यांमध्ये स्थापण्याचे धोरण ठरले. अर्थात ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील एक कौतुकास्पद कामगिरी आहे. दुर्गम भागासाठी रेल्वे हॉस्पिटलचे हे स्वप्न 1993 साली प्रत्यक्षात आले. याच दरम्यान बांगलादेश आणि कंबोडियासारख्या देशांमध्ये त्यांच्यासाठी सोयीच्या असणाऱया पाण्यातील बोटींवरील दवाखाने ही संकल्पना प्रत्यक्षात आली होती. पण राज्यकर्त्यांना आपल्या कामाचे भांडवल करता आले नाही तर त्याचा लाभ इतरांनी घेतला तर कोणालाही दोष देता येणार नाही. अर्थात काँग्रेसने आपल्या काळातील या चांगल्या कार्याबद्दल अद्यापही काही वक्तव्य केल्याचे समजले नाही. माध्यमांना विसर पडला तसाच काँग्रेसलाही आपल्या कामाचा विसर पडला हे त्याहून अधिक विशेष. आणि मग रेल्वेच्या अधिकाऱयांनी या गाडीत केलेल्या सुधारणांसह संपूर्ण श्रेय आजच्या राज्यकर्त्यांना दिले तर ते चुकीचे ठरेल किंवा नाही हा जसा प्रश्न आहे तसाच रेल्वे ही एक संस्था आहे आणि त्यांनी आपल्याच 1991 साली केलेल्या कामाची अर्धसत्य माहिती 31 वर्षांनी बदललेल्या परिस्थितीत देणे म्हणजे त्या संस्थेने स्वतःचीही केलेली अवहेलनाच आहे. रेल्वेतील अधिकाऱयांनी असे अर्धसत्य सांगण्यापूर्वी आपण आपल्याच उज्ज्वल इतिहासाला लपवतो आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा राज्यकर्ते बदलतील तसा संस्थांच्या उज्ज्वल इतिहासमध्येही बदल होत राहायचा आणि अशा प्रकारच्या घोषणांवरील जनतेचा विश्वास कायमचा उडून जायचा. आपली विश्वासार्हता जपण्यासाठी तरी रेल्वेच्या अधिकाऱयांनी अशी चूक करू नये.
Previous Articleइम्युनिटी आणि फ्रॉम होम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








