अध्याय अकरावा
श्रीनाथमहाराजानी, श्रीकृष्णाच्या मोहक मूर्तीचं केलेलं अत्यंत बहारदार वर्णन वाचून श्रीकृष्णाची स्वरूपसुंदर मूर्ती डोळय़ापुढे उभी राहते. ते सांगतात, देदीप्यमान असा श्यामवर्ण, मुकुट, कुंडले व मेखला यांनी विराजमान गळय़ात कौस्तुभमणि, वनमाला आणि भरजरीचा झळाळणारा पितांबर, कपाळावर लावलेला पिवळा टिळा, ओंकारामध्ये जशा श्रुती असाव्यात, ज्याप्रमाणे जीव व शिव भिन्नपणाने एकत्र असावेत, त्याप्रमाणे खालचा व वरचा असे दोन्ही ओठ श्रीहरीच्या अंगामध्ये सारखेपणाने व सारख्याच गुणांनी जुळून राहिले. सगुणस्वरूपामध्ये तो नारायण आर्तरूपी चकोरांना अमृतपान, मुमुक्षुरूपी चातकांना स्वानंदघन आणि सर्व भूषणांना भूषण होऊन राहिला आहे.
चारही हातांतील चार आयुधांची कार्ये निरनिराळी आहेत. श्रीकृष्ण हे सगुणस्वरूप झालेले पाहून जणू काय चार वेद आत्मज्ञानासाठी त्या चार हातांतील आयुधे झाले आहेत. वेदांना देव कळला नाही म्हणून त्या वेदांना लज्जा उत्पन्न झाली म्हणून आपला प्रताप जगामध्ये दाखविण्यासाठी ते हरीच्या हातातील आयुधे झाले. सामवेद शंख झाला, यजुर्वेद चक्र झाला, अथर्ववेद तीक्ष्ण धारेची गदा झाला आणि ऋग्वेद नाजुकसे कमळ झाला. अशा प्रकारे चार हातात धरून चार वेदांना परमेश्वराने संतुष्ट करून सोडले.
तेव्हा उपनिषदेही आपण जगात मिरवावे म्हणून देवाची बाहुभूषणे व बाजुबंद झाली आणि हातातील लखलखीत कंकणे ‘ब्रह्म ते मीच’ या शब्दध्वनींचा रुणझुण रुणझुण असा आवाज करू लागली. तसेच त्याची नखे, बोटे व हाताच्या बोटात असलेल्या त्या त्रिकोणी षट्कोनी इत्यादि आकारांच्या रत्नजडित अंगठय़ा, ही उपासकांना उपासना करण्याला मोठे साधन झाली आहेत. हृदयावरील पदकाला तर काही अपूर्वच तेज आहे. पोटावर त्रिगुणाच्या तीन वळय़ा शोभतात पहा आणि कंबरेतल्या मेखलेला लावलेल्या घागऱयांमध्ये कळस किती उत्तम शोभतो! पाचेचे कातीव खांब असावेत, त्याप्रमाणे दोन्ही पाय शोभतात. पाचेचे खांब केवळ निर्जीव असतात पण हे पाय हरीच्या अंगाचे अवयव असल्यामुळे सचेतन आहेत. दोन्ही पायांवर ध्वज, वज्र, अंकुश, ऊर्ध्वरेषा आणि पने इत्यादि चिन्हे आणि यवाच्या चिन्हाचे सामुद्रिक लक्षण असून प्रत्येक पावलाची आकृती अत्यंत सुंदर आहे.
पायांच्या तळव्यांना तांबडा रंग आणि त्यावर घनश्याम वर्णाची छटा ! त्यामुळे आकाशात अनेक इंद्रधनुष्यांचा समुदाय दिसावा त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या पायाची शोभा दिसत होती. जगन्नायकाला अशा रीतीने सगुण झालेला पाहून दशदिशांनीही त्याच्या चरणांजवळ येण्याचे धैर्य केले आणि आपले आत्मसुख साधून घ्यावे म्हणून त्या दशदिशा हरीच्या पायांची दहा बोटे होऊन राहिल्या. चंद्रही कृष्णपक्षामध्ये क्षीण होत होता, म्हणून त्यानेही जाऊन हरीचे चरण धरले, आणि तो त्याच्या पायांची नखे होऊन स्वतः अत्यंत पवित्र झाला. हे समजताच शंकराने त्या चंद्रालाच मस्तकावर धारण केले, तेंव्हा सहजच देवाच्या पायांचे तीर्थ त्या डोक्मयावरून वाहू लागले व त्याच जळाने जगाचा उद्धार झाला. असा देव सगुण झालेला पाहून चारही मुक्ती त्याच्या पायांजवळ येऊन नम्र झाल्या, म्हणूनच संत देवमूर्तीच्या चरणांपुढे नेहमी तत्पर असतात. त्या चार मुक्तीपैकी सलोकता आणि समीपता या दोघी दोन पायांमध्ये वाक्मयांच्या रूपाने वाजू लागताच सरूपता होती ती पायांतील सांखळय़ा झाली, आणि सायुज्यता पैंजण बनली.
ज्या पैंजणांचा धाक मी मी म्हणविणारे राक्षससुद्धा हृदयात वाहतात. सर्व सुख म्हणून जे कांही आहे, ते श्रीहरीच्याच ठिकाणी आहे आणि त्याच्याच चरणांच्या ठिकाणी समाधी आहे. नाथमहाराजांनी याप्रमाणे सगुण मूर्ती आपल्या डोळय़ापुढे उभी केली. भगवंत पुढे म्हणाले, हे उद्धवा ! धैर्य, वीर्य, उदार कीर्ति, गुणगांभीर्य, शौर्य, प्रख्याती, ह्यांना कारण माझी सगुण मूर्तीच आहे, हे नीट लक्षात ठेव. ह्या माझ्या मूर्तीच्या दर्शनाने डोळय़ांचे पारणे फिटते, हे दर्शन जन्ममरणाचे धरणे उठविते आणि विषयाचे खतपत्र फाडून टाकिते.
क्रमशः








