प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर बिम्सवर हल्ला केल्याच्या आरोपावरून एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक माहिती उघडकीस आली असून त्यामुळे आरोपींची धरपकड करणाऱया पोलिसांच्या उरात धडकी भरली आहे. दरम्यान, या प्रकरणी रविवारी आणखी सात जणांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
बुधवारी 22 जुलै रोजी रात्री घी गल्ली येथील एका वृद्धाच्या मृत्यूनंतर बिम्सवर संतप्त जमावाने हल्ला केला होता. कोविड-19 वॉर्डसमोर उभ्या करण्यात आलेल्या चार वाहनांवर दगडफेक करून रुग्णवाहिका पेटविण्यात आली होती. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली होती. केवळ 12 तासांत चौदा जणांना अटक करण्यात आली होती.
गेल्या गुरुवारी 23 जुलै रोजी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी चौदा जणांची धरपकड केली होती. त्याच दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तत्पूर्वी त्यांची स्वॅब तपासणीही करण्यात आली होती.
रविवारी सायंकाळी स्वॅब तपासणी अहवाल उपलब्ध झाले असून 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी एपीएमसी पोलिसांनी उज्ज्वलनगर येथील एका तरुणाला अटक केली होती. रविवारी आणखी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात आली असून दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे.
दानिश युसुफ चाँदवाले (वय 19), फरदीन मोहम्मदआझीम देसाई (वय 19) दोघेही राहणार जालगार गल्ली, सलमान जिलानी होंगल (वय 21) रा. चिरागनगर, असिफखान जफरुल्लाखान पठाण (वय 37) रा. जालगार गल्ली, शहिद जहूरअहमद बोजगार (वय 21) रा. जालगार गल्ली, अर्शद रियाजअहमद मणियार (वय 27) रा. गांधीनगर, फझल महमदगौस मुल्ला (वय 22) रा. घी गल्ली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
रविवारी सायंकाळी स्वॅब तपासणी अहवाल येताच हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱयांना यासंबंधी माहिती देण्यात आली. या बाधितांवर कुठे उपचार करायचे? हा प्रश्न होता. कारण सिव्हिल हॉस्पिटल सध्या कोरोना रुग्णांनी तुडुंब भरले आहे. त्यामुळे त्यांना कुठे हलवायचे? याचा विचार सुरू होता. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
दरम्यान, रविवारी अटक करण्यात आलेल्या सात जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. ही प्रक्रिया सिव्हिल हॉस्पिटल आवारातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू होती. याआधी अटक केलेल्या 14 पैकी 13 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे पोलीस व कारागृह अधिकारीही हादरले आहेत.
पोलीस अधिकारी धास्तावले
दगडफेक व जाळपोळीनंतर पोलीस आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांसह जिल्हय़ातील अनेक वरि÷ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱयांनी कोविड वॉर्ड परिसरात फेरफटका मारला होता तर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून धरपकडीची कारवाई सुरू झाली होती. या कारवाईत भाग घेतलेल्या पोलीस व अधिकाऱयांची धास्ती वाढली आहे. कारवाईत भाग घेतलेले अधिकारी व पोलिसांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस स्थानक एक दिवसासाठी सीलडाऊन करण्यात येणार आहे.
पोलिसांचीही स्वॅब तपासणी होणार
दगडफेक, जाळपोळ प्रकरणानंतर संशयितांची धरपकड करण्यासाठी पुढाकार घेतलेले अधिकारी व पोलिसांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांचीही स्वॅब तपासणी होणार आहे. यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधला असता या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.









