मंगेश तळवणेकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी ये-जा करणाऱया रुग्णवाहिका गोवा सीमेवरील पोलीस तपासणी नाक्यावर अडविण्यात येत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना शारीरिक व मानसिक त्रासाला समोरे जावे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी व रुग्णाला जीवदान मिळण्यासाठी तात्काळ तोडगा काढावा, यासाठी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले.
पालकमंत्री रविवारी सावंतवाडी दौऱयावर आले होते. त्यावेळी तळवणेकर यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा करत निवेदन सादर केले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्याच्या सीमेवर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हय़ातून गोव्यात जातांना सीमेवर पोलीस तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सिंधुदुर्गातून गोव्यात उपचारासाठी जाणाऱया रुग्णवाहिका गोवा पोलीस सोडत नाहीत. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाहीत. रुग्ण, त्यांचे नातेवाईक व रुग्णवाहिका चालक यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तपासणीसाठी तासन्तास रुग्णवाहिका थांबविण्यात येत असल्याने गंभीर रुग्ण उपचाराविना दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातून गोवा- बांबोळी रुग्णालयात ये-जा करणाऱया रुग्णवाहिकांना अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी तळवणेकर यांनी केली.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, आरोग्यासारख्या अत्यावश्यक
प्रश्नासंदर्भात गोवा सरकारने माणुसकी दाखविणे गरजेचे आहे. अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहेत. त्यासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाणाऱया रुग्णवाहिकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यात येईल.









