एका दिवसात अनेक नेते, पत्रकारांना केले अनफॉलो
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी मागील काही दिवसांपासून ट्विटरवर चर्चेचा विषय ठरले आहेत. राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक लोकांना ट्विटरवर अनफॉलो केले आहे. या लोकांमध्ये काँग्रेसचे नेते, काही जवळचे सहकारी आणि अनेक पत्रकारही सामील आहेत. याचबरोबर वायनाड येथील खासदार कार्यालयात काम करणारे काही कर्मचारी आणि दिल्लीत कार्यरत वरिष्ठ पत्रकारांचेही नाव यात सामील आहे.
राहुल गांधी यांच्या या कृतीवर सोशल मीडिया तसेच राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे. चर्चेला उधाण आल्यावर काँग्रेसच्या सूत्रांकडून राहुल गांधी यांचे अकौंट रिप्रेश केले जात असल्याचे सांगण्यात आले. लवकरच काही लोकांची यादी तयार होणार असून त्यांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील. यात सध्या अनफॉलो करण्यात आलेले लोकही सामील असू शकतात असे समजते.
काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात येत असले तरीही राहुल गांधी यांच्या या कृतीमुळे चर्चांना ऊत आला आहे. तसेच याकडे राहुल यांच्या भविष्यातील रणनीतिची तयारी म्हणूनही पाहिले जात आहे. राहुल गांधी मागील काही काळात ट्विटरवर आक्रमक राहिले आहेत. कोरोनाकाळत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांच्या विरोधकांनी राहुल यांच्यावर केवळ ट्विटरवरच अधिक सक्रीय असल्याबद्दल टीका केली आहे.
कोविडला मोविड ठरविल्यावर राहुल गांधी यांचे ट्विटर अकौंट अलिकडेच वादात सापडले होते. भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेत अशाप्रकारची भाषा वापरू नये असे म्हटले होते. पण राहुल गांधी यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याचे कारण केवळ नरेंद्र मोदी असल्याने कोविडचे नाव मोविड केल्याचा दावा केला होता.









