प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केले. करोनाचा संसर्ग रोखताना संघाच्या कार्यकर्त्यांचा बळी गेला, अशी एकही बातमी माझ्या वाचनात आली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने धारावीतील करोना नियंत्रणाचे कौतुक करताच मात्र श्रेय घेण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. संघाने धारावीत काम केले असेल तर आता संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातही काम करावे. राज्यभर काम करून करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणावा, असा उपहासात्मक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांनी संघाला लगावला.
वाढीव वीज बिलांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेट्टी बोलत होते. शेट्टी म्हणाले, मुंबईमध्ये सफाई कामगार, पोलीस कर्मचाऱयांचा बळी गेल्याचे आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये पाहिले. पण संघाच्या एकही कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचे ऐकले नाही, अथवा माध्यमांमध्ये पाहिले नाही.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर
शेट्टी म्हणाले, भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ज्या राज्यांमध्ये इतर पक्षांची सत्ता आहे, ती राज्ये आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर केला जात आहे. यापूर्वी देशात अनेक पक्षांचे सरकार झाले, पण असा प्रकार कोणत्याही पक्षाने अथवा आघाडीने केला नाही.
शेट्टींना संघाच्या कार्यकर्त्यांची यादीच पाठवतो
माजी खासदार राजू शेट्टीच्या उपहासात्मक टोलेबाजीला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, संघाच्या कार्यकर्त्यांनी धारावीत निश्चितपणे काम केले आहे. या सर्व कार्यकर्त्यांची यादीच शेट्टी यांना पाठवणार आहे.