वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने देशातील वेटलिफ्टर्ससाठी दोन महिन्यांच्या कालावधीकरिता राष्ट्रीय सराव शिबिर आयोजित करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. सदर शिबिर 21 डिसेंबरपासून पतियाळामध्ये घेतले जाणार होते. पण आता या सराव शिबिराचे ठिकाण बदलण्यात आले असून आता हे शिबिर पतियाळा ऐवजी मुंबईत होणार आहे.
पुढील वषी होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून हे शिबिर महत्त्वाचे राहील. या शिबिरात आठ वेटलिफ्टर्सचा सहभाग राहील. मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकासमीप असलेल्या स्टेडियममध्ये हे शिबिर दोन महिने चालणार आहे. या शिबिरात माजी महिला विश्वविजेती मीराबाई चानू, दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा सतीश शिवलिंगम, तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा हे या शिबिरासाठी 17 डिसेंबरपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. कोरोना समस्येमुळे या सराव शिबिराचे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी दिली.
महालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळ असलेलया रेल्वेच्या स्टेडियममध्ये हे शिबिर दोन विविध गटांमध्ये घेतले जाणार आहे. जेरेमि लालरिनुंगा, अचिंता शेली, जे. दलिबेहरा, पी. अनुराधा, राखी हलदर, स्नेहा सोरेन हे या शिबिरात दाखल होणार आहेत. देशातील वेटलिफ्ंिटग स्पर्धा मार्चपासून सुरू होतील, अशी अपेक्षा फेडरेशनच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे.









