नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीची प्रक्रिया ऑलिम्पिक पूर्ण होईतोवर लांबणीवर टाकली गेली आहे. टोकियो ऑलिम्पिक दि. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत असून त्यानंतरच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते निवडले जातील, असे क्रीडा मंत्रालयाने वृत्तसंस्थेला कळवले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱया ऍथलिट्सचा पुरस्कारासाठी विचार करण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
दरवर्षी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जेत्यांचा सन्मान केला जातो. यंदा टोकियो ऑलिम्पिक दि. 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यानंतर अंतिम निवडी होतील, असे एकंदरीत चित्र आहे. मात्र, ऑलिम्पिक झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत निवडी निश्चित होऊ शकल्या नाहीत तर पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडण्याची शक्यता चर्चेत आहे.
‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी आमच्याकडे यापूर्वीच अर्ज व शिफारशी पोहोचल्या आहेत. आता अर्ज करण्याची मुदतही उलटून गेली आहे. मात्र, ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा पुरस्कार निवडीत विचार करण्याविषयी आमच्या मागील बैठकीत चर्चा झाली. आम्ही यावरच अंतिम निर्णय घेणार आहोत. ऑलिम्पिक झाल्यानंतर आणखी एक बैठक घेण्याचा आमचा विचार आहे. आमच्या ऍथलिटनी ऑलिम्पिक पदक जिंकले तर त्यांचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीत निश्चितपणाने विचार होईल. मात्र, ऑलिम्पिक झाल्यानंतर आठवडाभर ते 10 दिवसात बैठक होऊ शकली तरच पुरस्कार वितरण पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे होईल. तसे न झाल्यास वितरण सोहळा लांबणीवर पडू शकतो’, असे सूत्राने नमूद केले.
120 पेक्षा अधिक ऍथलिट पात्र
यंदा टोकियो ऑलिम्पिकसाठी 120 पेक्षा अधिक भारतीय पात्र ठरले असून कोव्हिड-19 निर्बंधामुळे चाहत्यांशिवायच सर्व इव्हेंट्स घेतले जाणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी दि. 5 जुलै ही शेवटची मुदत होती. इच्छुक क्रीडापटूंना स्वतः ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा दिली गेली होती. राष्ट्रीय फेडरेशन्सनी देखील आघाडीच्या क्रीडापटूंची पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी गतवर्षापासून बक्षीस रक्कम वाढवली गेली आहे. त्यानुसार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी 7.5 लाखाऐवजी 25 लाख रुपयांचे इनाम असेल. अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य (आजीवन) पुरस्कार जेत्यांसाठी 5 लाखांवरुन 15 लाख रुपयांचे इनाम दिले जाईल. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी 5 लाख रुपयांऐवजी 10 लाख रुपयांचे इनाम असेल. मागील वर्षी कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा व्हर्च्युअल स्वरुपात घ्यावा लागला होता.









