पुरूष गटात कर्नाटक तर महिला गटात आसाम जेते; महाराष्ट्रला दोन्ही विभागात रौप्यपदके
क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला तो आसामचा बॅडमिंटन संघ. काल डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरील इनडोअरमध्ये खेळविण्यात आलेल्या महिलांच्या सांघिक अंतिम फेरीत आसामने महाराष्ट्रचा 3-0 गेम्सनी पराभव केला. पुरूष विभागातील सांघिक जेतेपद कर्नाटकने मिळविताना महाराष्ट्रचा 3-1 असा पराभव केला. दोन्ही गटात महाराष्ट्रला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला विभागातील पहिल्या सिंगल्समध्ये आसामच्या अश्मिता छलिहाने महाराष्ट्रच्या पूर्वा बर्वेचा 21-16, 21-12 असा

पराभव करून 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये एकेरीत इशरानी बारुआने आलिसा नाईकचा पहिल्या सेटमधील पिछाडीनंतर 9-21, 21-13, 21-18 असा पराभव केला व आघाडी 2-0 अशी वाढविली. तिसऱ्या सामन्यात आसामच्या इशारानी बारुआ व अश्मिता छलिहा जोडीने सिमरन सिंघी व रितीका ठाकेर जोडीला पहिल्या सेटमधील पिछाडीनंतर 21-19, 21-13 असा पराभव केला व सुवर्णपदकावर आपलं नाव कोरले. महिला विभागात महाराष्ट्रला रौप्य तर आंध्रप्रदेश व पंजाब यांना कास्यपदके मिळाली.
पुरूष विभागात कर्नाटकने महाराष्ट्रला 3-1 असे पराभूत केले व सुवर्णपदक मिळविले. पहिल्या एकेरीत कर्नाटकच्या एस. भार्गवने महाराष्ट्रच्या हर्षील दाणीला 18-21, 21-19, 21-15 असा पराभव केला व आघाडी घेतली. दुसऱ्या एकेरीत महाराष्ट्रच्या रोहन गुर्बानीने के. पृथ्वी रॉयचा 23-21, 22-24, 21-14 असा पराभव केला व लढत 1-1 अशी बरोबरीत आणली.
त्यानंतर दुहेरीत कर्नाटकच्या एच. व्ही. नितीन व के. साई प्रतीक जोडीने महाराष्ट्रच्या दीप रांभिया व अक्षण शेट्टी जोडीला 21-12, 21-14 असे सहज हरविले व आघाडी 2-1 अशी केली. त्यानंतर निर्णायक एकेरीत आयुष शेट्टीने दर्पण पुजारीला 21-16, 21-17 असे नमविले व कर्नाटकच्या नावावर सुवर्णपदक केले. सांघिक गटात महाराष्ट्रला रौप्य तर आसाम व उत्तराखंडला कास्यपदके प्राप्त झाली.









