विविध चेकपोस्टवर बजावताहेत कर्तव्य : ’तरुणभारत’च्या वृत्ताने झाला कालवा
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेल्या महिन्यापासून जिल्हा प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. आलेल्या राष्ट्रीय आपत्तीत सर्वांनीच एकमेकांना सहकार्य करुन हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये पोलीस दल व आरोग्य विभागाची लढाई सर्वांनाच दिसली. आता कोरोनाचे संकट वाढू लागले असताना सर्वच विभागांनी यात उतरण्याची गरज असताना अद्याप शिक्षक कसे दिसत नाहीत याची चर्चा सोशल मिडियासह व्हॉटसऍपवर सुरु होती. त्या अनुषंगाने तरुण भारत ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर कालवा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. मात्र, शिक्षक देखील पोलीस झाले असून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असल्याची माहिती समोर आलीय.
प्रारंभी सातारा जिल्हय़ात कोरोनाची दहशत जाणवत नव्हती. प्रशासनाला त्याची गंभीरता कळाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग कामाला लागला होता. त्यांना सर्व आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडीसेविका, असंख्य सफाई कामगार सहभागी होवून कार्यरत आहेत. यामध्ये जो शिक्षक समाजाला घडवतो व प्रबोधन करण्यामध्ये तयार असतो तो प्राथमिक शिक्षक दिसत नसल्याबाबत चर्चा सुरु होती. वास्तविक देशावर राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा त्याचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक शिक्षक नेहमीच आघाडीवर असतो. निवडणूक, जनगणना, हागनदारी मुक्त गाव, शोषण आहार योजना ह्या सर्व गोष्टी शिक्षक आपले दैनंदिन शालेय कामकाज सांभाळून करत असतो. मात्र तोच दिसत नसल्याने याबाबतचे वृत्त तरुण भारत ने प्रसिध्द केल्यावर त्यावर प्रतिक्रियाही उमटल्या.
ज्या ज्या भागात कोरोनाविषयक संवेदनशील स्थिती निर्माण झाली आहे तिथे शिक्षकांना देखील राष्ट्रीय कर्तव्यावर जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्याचे सांगण्यात आले. त्या त्या ठिकाणी शिक्षक काम करत असून त्यांच्या अनुषंगाने आलेले वृत्त निराधार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. मात्र कोरोनाची लढाई सुरु होवून महिना उलटल्यानंतर या लढाईत शिक्षकांना सहभागी करुन घेण्याची शासनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इतर खात्यातील कर्मचाऱयांचा जो काही समज झाला तो सामाजिक पटलावर आला असला तरी शिक्षक राष्ट्रीय आपत्तीत कोठेही गायब नाहीत.
चेकपोस्टवर बजावत आहेत कर्तव्य
सातारा तालुक्यातून मिळालेल्या यादीनुसार 28 शिक्षकांची चेकपोस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. जिथे पोलीस दलाकडून वाहनांची तपासणी होते. यामध्ये वाढेफाटा, सातारा होलसेल मार्केट, बाँबे रेस्टारंट चौक, संगममाहुली या चेकपोस्टचा समावेश आहे. येथे सकाळी 8 ते दुपारी 4 व दुपारी 4 ते रात्री 12 अशा पध्दतीने शिक्षक पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. गटशिक्षणाधिकाऱयांनी याबाबत आदेश काढून संचारबंदी कामी पोलिसांनी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर कराड तालुक्यातील गोवारे फाटा, बाबरमाची रोड, करवडी फाटा, गजानन हौसिंग सोसायटी, टेंभू फाटा, विरवडे फाटा व वनवासमाची रोड येथे पोलीसांबरोबर शिक्षक बांधत राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यात सहभागी झाले आहेत.
खासदार सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केली होती इच्छा
कोरोना हे जगावर आलेले संकट असून ही मानवता वाचवण्याची लढाई आहे. या आपतकालीन कामात शिक्षकांना देखील सहभागी करुन घ्यावे याबाबत मी स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या व्हॉटसऍपवर विनंती केली होती. शिक्षक कोठेही गायब नाहीत. संचारबंदी असल्याने ते शासकीय नियमांचे पालन करत घरीच थांबले. आता आदेश प्राप्त झाल्यानंतर शिक्षकही कर्तव्य निभावत आहेत. 100 आरएसपी अधिकारी पोलिसांच्या बरोबर कर्तव्य बजावताना दिसतील. जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हय़ातील बंदोबस्त नेमणुकीसाठी आदेश काढले आहेत.








