पूर्णपणे सौरऊर्जेवर अवलंबून असलेले देशातील पहिले शहर : पर्यटकांची पसंती
वृत्तसंस्था/ दीव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा आणि नागर हवेलीच्या दीवचा शनिवारी दौरा केला आहे. केंद्रशासित प्रदेशातील उत्साहपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करताना राष्ट्रपतींनी सौरऊर्जा क्षेत्रात मिळविलेल्या यशाचाही उल्लेख केला आहे. स्वतःच् ऊर्जेच्या 100 टक्के गरज सौरऊर्जेतून भागविणारे दीव हे भारतातील पहिले शहर ठरल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दीवमध्ये पर्यटकांची विशेष पसंती असलेल्या अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांचे जतन तसेच सौंदर्यीकरणाचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. दीव जिल्हय़ातही आत्मनिर्भर भारत मोहीम वेगाने साकार होत असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.
2018 च्या प्रारंभीच अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला चालना देण्याच्या दिशेने पाऊल टाकत दीव सौरऊर्जेने 100 टक्के संचालित होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला होता. तेथे सौरऊर्जेचे उत्पादन अत्यंत वेगाने वाढले आहे. केवळ 42 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या दीवमध्ये भूमीची कमतरता आहे, तरीही सुमारे 50 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
13 मेगावॅट विजेचे उत्पादन
दीव एकूण 13 मेगावॅट वीज सौरऊर्जेद्वारे तयार करतो. यातील सुमारे 3 मेगावॅट वीज छतांवर लावण्यात आलेले सौरघट तर 10 मेगावॅट अन्य सौरऊर्जा प्रकल्पांमधून प्राप्त केली जाते. याआधी गुजरात सरकारच्या ग्रिडमधून दीवला वीजेचा पुरवठा व्हायचा.
आत्मनिर्भर दीव
सौरऊर्जा प्रकल्पांपूर्वी पाणी आणि विजेसाठी दीव गुजरात सरकारवर अवलंबून होते. 2018 मध्ये दीवमध्ये विजेची मागणी 7 मेगावॅट इतकी होती. तर सौरऊर्जा प्रकल्पानंतर सुमारे 10.5 मेगावॅट विजेचे उत्पादन त्याद्वारे प्राप्त करण्यात येत आहे. सौरऊर्जेच्या वापराने लोकांना दिलासा मिळाला आहे.









