प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रपतींनी काल रविवारी गोव्यातील काही ठिकाणांना भेटी दिल्या आणि सायंकाळी ते दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपतींची ही गोवा भेट उत्साहवर्धक तसेच संस्मरणीय ठरली.
राष्ट्रपती शनिवारी दुपारी गोव्यात दाखल होते. राजभवनावर राष्ट्रपतींनी एक रात्र मुक्कम केला. सकाळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत चहापान केले. शनिवारी कांपाल येथील मैदानावर खास उभारण्यात आलेल्या शामियानात अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालला. त्याचाही आस्वाद राष्ट्रपतींनी घेतला आणि एकंदरीत त्यांची भेट स्मरणीय ठरली.
राष्ट्रपतींना लामणदिवा दिला भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पत्नी सुलक्षणा सावंत यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवन येथे भेट घेतली आणि त्यांनी राष्ट्रपतींना गोवा राज्याचे प्रतीक म्हणून लामण दिव्याची भेट दिली. यावेळी सौ. सावंत यांनी सौ. सविता कोविंद यांना गोव्याची पारंपरिक साडी म्हणून कुणबी साडी भेट दिली.
राष्ट्रपतींची दोन दिवशीय गोवा भेट सुखरूप संपन्न झाल्याने पोलीस दलाने एकदाचा सुटकेचा निःश्वास सोडला. कारण गेले चार-पाच दिवस त्यांच्यासाठी खूपच धावपळीचे गेले. पणजीत आलेल्या अनेक वाहनचालकांना रस्ते बंद केल्याने त्रास झाला आणि त्यांना गैरसोय सोसावी लागली.
राष्ट्रपतींनी दिला नव्या जोडप्याला आशीर्वाद
वेर्णा येथील महालसा देवीच्या दर्शनावेळी घडला योगायोग

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीस रवाना होण्यापूर्वी जुने म्हार्दोळ म्हणजे वेर्णा येथील महालसा नारायणी मंदिरास सपत्नीक भेट दिली. त्यावेळी तेथे नव्याने विवाह झालेल्या वधू – वर जोडप्यास त्यांनी आशीर्वादही दिले. त्यामुळे त्या नवविवाहित जोडप्याचा आनंदही गगनात मावेनासा झाला. गुरुदास ल. सावंत यांचे सुपुत्र दिप्तेश यांचा शुभविवाह सागर श्री शेट नार्वेकर यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला. त्यांना राष्ट्रपतींचे आशीर्वाद लाभले.
दरम्यान, राष्ट्रपतींची मंदिर भेट आणि विवाह सोहळा हा एक योगायोग होता. त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला तेव्हा विवाहाची माहिती नव्हती, परंतु जेव्हा माहिती मिळाली तेव्हा राष्ट्रपतींनी त्या जोडप्यास शुभेच्छा दिल्या, असे व्ट्टि राष्ट्रपती भवनातून करण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्निक हजर होते.









