ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत ही आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर मारहाण करणाऱ्या घटना घडत आहेत. वैद्यकीय कमरचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी अध्यादेश काढला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशाला आज मंजुरी दिली आहे. याबरोबरच हा अध्यादेश जारी करण्याची अधिसूचना ही देण्यात आली आहे.
डॉक्टर, कर्मचारी आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हल्लेखोरांना किमान तीन महिने ते सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच 50 हजार ते पाच लाख रुपयांची दंडात्मक कारवाई होऊ शकते. हल्लेखोरांविरोधात दाखल झालेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असेल. त्याची 30 दिवसांचे चौकशी पूर्ण केली जाईल. एका दिवसात दोषींना शिक्षा ठोठावली जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधातील हल्लेखरांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे.









