अटीतटीच्या लढतीत खानापुरातील कॉलेज बॉय उपविजेता : स्पर्धेत 44 संघांचा सहभाग
वार्ताहर /खानापूर
खानापूर येथे श्री गजानन ट्रॉफी 2022 भव्य क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सरकार रॉयल मराठा रामनगर संघ विजेता ठरला तर खानापूरचा कॉलेज बॉईजचा संघ उपविजेता ठरला.
गेल्या आठ दिवसांपासून खानापूर येथील मलप्रभा क्रीडांगणावर प्रथम क्रमांकासाठी 1 लाख 21 हजार रुपयांच्या पारितोषिकासह आकर्षक चषकाची भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली. या क्रिकेट स्पर्धेत 44 संघांनी भाग घेतला होता. अनेक नामवंत अशा जिल्हय़ातील व जिल्हय़ाबाहेरील क्रिकेट संघांनी यामध्ये भाग घेतला. चुरशीच्या खेळात खानापूर येथील कॉलेज बॉईज संघ व रामनगर येथील सरकार रॉयल मराठा संघ यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये रामनगर संघाने यश संपादन केले.
पहिल्या फलंदाजीमध्ये खानापूर बॉईज संघाने सर्वबाद 85 धावा केल्या. रामनगर संघाने प्रारंभापासून जोरदार फलंदाजी केली. पण, तितक्मयाच ताकदीने खानापूर बॉईज संघाने त्यांना प्रत्युत्तर दिले. क्षेत्ररक्षण कमकुवत ठरल्याने खानापूर कॉलेज बॉईज संघाला शेवटपर्यंत कसरत करावी लागली. रामनगर संघाला शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूत 18 धावांची गरज होती. रामनगर संघातील खेळाडू रोहित देसाई याने तीन चेंडूत तीन षटकार खेचून 18 धावा काढून पूर्ण बाजीच पलटवली आणि सरकार रॉयल मराठा संघ विजयी झाला. त्यामध्ये सरकार रॉयल मराठा रामनगर संघ प्रथम क्रमांकाचे 1 लाख 21 हजार रुपये व श्री गजानन ट्रॉफीचा मानकरी ठरला.
खानापूर येथील भाजप कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या पुढाकाराने तसेच भाजप पुरस्कृत या क्रिकेट स्पर्धेत सामनावीर इजाज कुरोसी बाळेकुंद्री, उत्कृष्ट फलंदाज अर्जुन भोसले खानापूर, उत्कृष्ट गोलंदाज अर्जुन नेलगडे रामनगर हे वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी ठरले.
अंतिम सामन्याचे उद्घाटन व बक्षीस वितरण तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबुराव देसाई, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर, जिल्हा पंचायत माजी सदस्य जोतिबा रेमाणी, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, लैला शुगर्सचे व्यवस्थापक सदानंद पाटील, भाजप नेते पंडित ओगले, सदानंद होसूरकर, आप्पय्या कोडोळी, वसंत देसाई यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.









