पॅरिस, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि फ्रान्स यांच्यातील राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाबाबत काही नवीन दावे समोर आले आहेत. प्रेंच विमान निर्माता दसॉल्टने भारताला 36 राफेल लढाऊ विमाने विकण्यासाठी मध्यस्थांना 7.5 दशलक्ष युरो (65 कोटी रुपये) कमिशन दिले, असे प्रेंच पोर्टल मीडियापार्टने वृत्त दिले आहे. त्याचवेळी सीबीआय आणि ईडी यासारख्या भारतीय तपास यंत्रणांकडे कागदपत्रे असूनही तपास सुरू केला नसल्याचा दावाही फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे.
राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सीबीआय आणि ईडीकडे ऑक्टोबर 2018 पासून पुरावे आहेत. राफेल जेटच्या विक्रीसाठी दसॉल्टने सुशेन गुप्ता यांना लाच दिली होती. या कथित पेमेंटची मोठी रक्कम आगाऊ देण्यात आली होती. यासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध असूनही भारतीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. तसेच तपासही पुढे सुरू केला नाही, असे पोर्टलचे म्हणणे आहे.
अहवालावरून फ्रान्समध्ये राजकारण तप्त
हे प्रेंच ऑनलाईन जर्नल 59,000 कोटी रुपयांच्या राफेल सौद्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे. ‘राफेल पेपर्स’च्या मीडियापार्टच्या तपासामुळे जुलैमध्ये फ्रान्समध्ये राजकारण तापले होते. अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणातील भ्रष्टाचार आणि पक्षपाताच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुशेन गुप्ता याच्यावर मॉरिशसमध्ये नोंदणीकृत शेल कंपनीमार्फत ऑगस्टा वेस्टलँडकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. गुप्ता हे ऑगस्टा वेस्टलँड डीलशीही संबंधित होते.









