केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांची माहिती : विविध राज्यांना 1.21 लाख डोसचे वितरण
प्रतिनिधी / बेंगळूर
ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांना शुक्रवारी ऍम्फोटेरिसिन-बीचे एकूण 1 लाख 21 हजार वायल्स वितरीत केले आहेत. कर्नाटकाला 9,750 वायल्स उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
स्वदेशी ऍम्फोटेरिसिन-बीचे उत्पादनही वाढले आहे. त्याचप्रमाणे या इंजेक्शनच्या आयातीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. येत्या काही दिवसात या इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा यांच्यातील असमतोल दूर होईल. सध्या ऍम्फोटेरिसिन-बीच्या वायल्सचा नियमित पुरवठा केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या अधिक मागणी असणाऱया ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला आहे. विक्रेत्यांकडून विक्री होणाऱया ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमतीत 198 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. ती आता आता 70 टक्क्यांवर निर्धारित करण्यात आली आहे. तीन दिवसांत कगमाल किंमत सूची देण्याची सूचना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उत्पादक आणि विक्रेत्यांना देण्यात आली आहे. आतापर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा समावेश अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांमध्ये नव्हता. त्यामुळे त्याच्या दरावर नियंत्रण नव्हते. आता जनेतच्या अनुकूलतेसाठी डीपीसीओ-2013 या कायद्यातील अनुच्छेद 19 मध्ये दुरुस्ती करून दरावर नियंत्रण आणण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
वर्षभरात सर्वांना लस
बेंगळूरच्या के. आर. पुरम विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांच्या नेतृत्वाखालील संकटग्रस्तांना ग्रॉसरी किटचे वितरण करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सदानंदगौडा म्हणाले, केंद्र सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत देशातील सर्व 130 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. जून महिन्यात 65 लाख जणांना लस देण्यात येईल. त्यामध्ये केंद्र सरकार लसीचे 50 लाख डोस देणार आहे.









