ऑनलाईन टीम / अमरावती :
देशातील आर्थिक मंदीचा फटका रोजगारनिर्मितीला बसला असतानाच राज्य सरकारच्या गृहविभागाने सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, जागतिक मंदीचा परिणाम रोजगारावर झाला आहे. तरुणांना रोजगाराची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यातच नुकताच एसबीआयने सादर केलेल्या अहवालात यंदा 16 लाख रोजगार कमी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने रोजगाराबाबत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृहविभागाने मेगा भरती हाती घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रयत्नात गृहविभाग आहे. त्यामुळे सात ते आठ हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती होणार आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था, अवैध सावकारी, तसेच नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पोलीस भरती होणार आहे.









