जनजीवन विस्कळीत, प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
प्रतिनिधी/ पणजी
गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार कोसळणाऱया पावसामुळे राज्यात सर्वत्र पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवार-रविवार दोन्ही दिवस संततधार पावसाने राज्याला झोडपून काढले. यावर्षी 30 इंचांपेक्षा जादा पाऊस पडलेला असून राज्य ओल्या दुष्काळाच्या दिशेने पुढे सरकत आहे.
मान्सून अति आक्रमक बनलेला आहे. गेल्या 24 तासात संततधार व मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प केले. तसेच सातत्याने जोरदार वादळी वाऱयासह कोसळणाऱया पावसाने सर्वत्र जलमय स्थिती झाली आहे. राज्यातील सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सायंकाळी थोडी विश्रांती घेतल्याने पुराचे प्रमाण थोडे कमी झाले. हवामान खात्याने आगामी 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा इशारा दिलेला आहे. गेल्या 24 तासात काणकोण वगळता सर्वत्र मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात विशेषतः डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
सरांसरी 130 इंच पाऊस!
सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता यावर्षी आतापर्यंत 130 इंच पाऊस झालेला आहे. साधारणतः दरवर्षी 110 ते 120 इंच या दरम्यान पाऊस पडायचा. गतवर्षी सुमारे 158 इंच पाऊस झाला. मात्र याची नोंद 30 सप्टेंबर रोजी झाली होती. यावर्षी 16 ऑगस्ट रोजी 130 इंच पाऊस झालेला आहे. मौसम संपण्यास अद्याप 45 दिवस बाकी असून पाऊस कमी होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गोवा ओल्या दुष्काळाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे दिसून येते. 30 सप्टेंबर पर्यंत गोव्यात 200 इंच पाऊस होण्याचीच शक्यता जास्त आहे.
पेडणेत 150 तर सांखळीत 135 इंच
राज्यात पावसाने कहर केलेला आहे. पेडणेत गेल्या 24 तासात 5.5 इंच, म्हापसामध्ये 6 इंच, सांखळीत 5 इंच, फोंडा येथे 4.5 इंच, पणजीत 4 इंच, जुने गोवेत 5 इंच, काणकोण 1 इंच, दाबोळी 3.5 इंच, मडगाव 2 इंच, मुरगाव 4 इंच, केपे 3.5 इंच, सांगे 3.5 इंच, असा मुसळधार पाऊस झाला. रविवारी देखील पावसाने झोडपलेले असून त्याचा अहवाल आज उपलब्ध होईल. पेडणेत आतापर्यंत पावसाने इंचांचा उच्चांक गाठला असून तेथे 150 इंच झालेला आहे. सांखळीत 135 इंच तर पणजीत 120 इंच व जुने गोवेत 128 इंच पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात आज सोमवार दि. 17 रोजी सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार व पावसाचे हे प्रमाण पुढील दोन दिवस तसेच राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान वादळी वाऱयाचा वेग ताशी 45 ते 50 प्रति कि. मी. या वेगाने जाईल तसेच समुद्रातील लाटांची उंची वाढण्याची शक्यता आहे. मच्छिमाऱयांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराच हवामान खात्याने दिला आहे.









