कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणाच्या टप्प्यात : मंगळवारी 5,041 नवे रुग्ण
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असून नव्या बाधितांच्या आकडेवारीचा आलेख खाली आला आहे. राज्यात मंगळवारी 1,32,600 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हीटीचे प्रमाण केवळ 3.80 टक्के इतके आहे. ही बाब दिलासादायक असून अनलॉकच्या दृष्टीने सकारात्मक आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 5,041 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 14,785 जण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 115 बाधितांचा बळी गेला आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या 1,62,282 इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने मोठय़ा प्रमाणात घट होत आहेत. राज्यात आतापर्यंत 27,77,010 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 25,81,559 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 33,148 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात लॉकडाऊन जारी असणाऱया अनेक जिल्हय़ांमध्येही संसर्ग नियंत्रणात येत आहे. बेळगाव जिल्हय़ात मंगळवारी 95 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात 133, चिक्कमंगळूर 224, चामराजनगर 79, दावणगेरे 183, शिमोगा 282, मंगळूर 482, हासन 522, म्हैसूर 490, कोडगू 64 आणि मंडय़ा जिल्हय़ात 213 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आतापर्यंत…
- एकूण कोविड चाचण्या 3,19,23,601
- एकूण बाधितांची संख्या 27,77,010
- एकूण संसर्गमुक्त 25,81,559
- एकूण कोरोनाबळी 33,148
- एकूण सक्रिय रुग्ण 1,62,282









