दिवसभरात 10,517 रुग्णांची नोंद : 8,337 संसर्गमुक्त :102 मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून शुक्रवारी राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी 7 लाख पार झाली आहे. शनिवारी देखील 10 हजारहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार मागील चोवीस तासांमध्ये 10,517 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,337 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दिवसभरात 102 जणांचा बळी गेला आहे.
शनिवारी सलग तिसऱया दिवशीही 1 लाखहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 7,00,786 रुग्ण आढळून आले आहेत. तर 5,69,947 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एकूण 8,891 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 1,20,929 इतकी आहे. त्यापैकी 892 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बेंगळूर शहर जिल्हय़ात शनिवारी 4,563 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात येथे 1,726 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या येथे सक्रिय रुग्णसंख्या 64,911 इतकी आहे. बेंगळूर शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून येथील सक्रिय रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. येथे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.









