दिवसभरात 67 कोरोनाग्रस्तांचीभर:हासनमध्येसर्वाधिक 21 जणपॉझिटिव्ह:
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात लॉकडाऊन आणखी शिथिल होताच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुंबईहून परतलेल्यांमुळे मंडय़ा जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाचा धोका वाढला होता. आता हासन जिल्हय़ाची अशी परिस्थिती झाली असून या जिल्हय़ात बुधवारी 21 नवे रुग्ण आढळून आले. तर राज्यभरात मागील 24 तासांमध्ये 67 रुग्णांची भर पडली. त्यापैकी 52 संसर्गबाधित व्यक्ती हे परराज्यातून परतलेले आहेत. दरम्यान, आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत राज्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या 1462 झाली आहे.
परप्रांतात अडकून पडलेल्यांना आपापल्या जिल्हय़ात जाण्यासाठी विशेष बस, रेल्वेची व्यवस्था सरकारने केली होती. तथापि, यामुळेच राज्यात कोरोनाचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने मुंबईतून आलेल्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बुधवारी हासनमध्ये आढळून आलेले 21 कोरोनाग्रस्त हे मुंबईतूनच परतले होते. त्याचप्रमाणे बिदरमध्ये 10, मंडय़ा जिल्हय़ात 8, गुलबर्ग्यात 7, उडुपीमध्ये 6, बेंगळूर शहर, तुमकूर, रायचूर जिल्हय़ांत प्रत्येकी 4 तसेच कारवार, मंगळूर आणि यादगिर जिल्हय़ात प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
महाराष्ट्रातून परतलेले 51 जण तर विशाखापट्टणहून परतलेली एक व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळली आहे. उर्वरित रुग्णांना इतरांमुळे संसर्ग झाला आहे. दरम्यान बुधवारी राज्यात 13 जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे संसर्गमुक्त झालेल्यांचा आकडा 556 इतका झाला आहे.
बेंगळूरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
बेंगळूरमध्ये 43 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याने यापूर्वी तामिळनाडूचा प्रवास केला होता. त्याला हृदयविकार आणि हायपर टेन्शनचा त्रास होता. त्याला 18 मे रोजी बेंगळूरमधील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.









