ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाविकास आघाडीच्या वाटय़ाला राज्यसभेच्या 4 जागा आल्या आहेत. आघाडीतील तीन पक्षांना त्यापैकी प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. तर उर्वरित एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या चार जागांमधील दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान यांना देण्याचे राष्ट्रवादीने निश्विच केल्याचे समजते. तसे झाल्यास शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येक एक जागा मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यसभेच्या उर्वरित चौथ्या जागेबाबात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मांडली.
तसेच काँग्रेसमध्ये रजनी पाटील, राजीव सातव आणि मुकुल वासनिक यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, यामधील उमेदवार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ठरवणार असून त्याची घोषणा बुधवारी होणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.








