वार्ताहर/ रत्नागिरी
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज 25 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरात येत आहेत. शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सकाळी 10. 30 वाजता ‘डिसमॅलटिंग कास्टिजमः लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेनशियल्स ऑफ हिंदुत्व’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. हे चर्चासत्र दोन दिवस चालणार आहे.
25 रोजी सकाळी 9 वाजता राजभवन मुंबई येथून हेलिकॉप्टरने तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथे राज्यपालांचे आगमन होणार असून तिथून शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे येतील. या ठिकाणी थोडावेळ राखीव असेल. त्यानंतर त्यांचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आगमन होईल. या कार्यक्रमानंतर सकाळी 11.05 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे ते प्रयाण करणार आहेत.
शहरात पोलीस बंदोबस्त
राज्यपालांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून विमानतळ ते मारूती मंदिर रस्त्यावरच्या खड्डय़ांची डागडुजी करण्यात आली. तसेच मारूती मंदिर परिसरातील अनेक फळविक्रेत्यांना हटवण्यात आले.









