32 वर्षांपासून तुरुंगात : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी पेरारिवलन याला सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन आदेशामुळे त्याची लवकरच सुटका होणार आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणात पेरारिवलन याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याने यापूर्वी 32 वर्षे तुरुंगवास भोगला आहे. चांगले वर्तन, शैक्षणिक पात्रता आणि आजारपणाच्या कारणावरून न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येदरम्यान झालेल्या स्फोटात वापरलेल्या साहित्याचा पुरवठा करण्याचा मोठा आरोप त्याच्यावर होता. पेरारिवलन 30 वर्षाहून अधिक काळ कारागृहामध्ये राहिला आहे. शिक्षा भोगत असताना त्याची वर्तणूक अत्यंत चांगली असून सरकारकडून निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होत असल्यास त्याला कारागृहात खितपत ठेवणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारचे ऍडिशनल सॉलिसीटर जनरल एम. नटराज यांनी पेरारिवलनच्या जामिनाला विरोध दर्शवला.
21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर याठिकाणी हत्या झाली होती. या हत्येदरम्यान स्फोटासाठी वापरलेली 8 वोल्टची बॅटरी पेरारिवलन याने मास्टरमाईंड शिवरासनला दिल्याचा आरोप होता. त्यानंतर 11 जून 1991 रोजी पेरारिवलन याला अटक करण्यात आली. या प्रकरणात 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यापैकी 6 आरोपी सध्या तुरुंगात आहेत. पेरारिवलन याने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तामिळनाडू सरकारने त्याच्या सुटकेला हिरवा कंदील दाखविला होता. परंतु राज्यपाल आणि केंद्र सरकारने अद्याप मंजुरी न दिल्याने तिढा कायम होता.









