सोन्या-चांदीचा लाखोंचा ऐवज लंपास
वार्ताहर/ राजापूर
राजापूर शहर बाजारपेठेतील मधीलवाडा येथील एक बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरटय़ांनी लाखो रूपये किंमतीचे दागिने आणि काही रोकड लंपास केली. बुधवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. शहरात भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली आहे. या चोरीमध्ये चोरटय़ांनी सोन्या-चांदीचे 4 लाख 54 हजाराचे दागिने व रोख रक्कम रूपये 20 हजार असा सुमारे 4 लाख 74 हजार रूपयांचा ऐवज लांबवला.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मधीलवाडा येथील पै. अकबर ठाकूर यांच्या घरात ही चोरी झाली आहे. पै. अकबर ठाकूर यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कन्या या ठिकाणी राहतात. मात्र त्या काहीवेळा त्या लगतच असलेल्या त्यांचे बंधू अशफाक ठाकूर यांच्या निवासस्थानी वास्तव्यास असतात. सोमवारी दुपारी या खुर्शीद व त्यांची बहीण आपले घर बंद करून अशफाक ठाकूर यांच्याकडे राहण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान खुर्शीद या आपल्या घरी आल्या असताना त्यांना घराच्या पुढील दरवाजाची कडी वाकलेली दिसली. त्यांनी तत्काळ या बाबत लगतच असलेल्या बंधू शहनाज ठाकूर यांना माहिती दिली. ठाकूर यांनी तत्काळ राजापूर पोलिसांशी संपर्क साधून या बाबत माहिती दिली.
या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात चोरटय़ांनी घरातील तळमजला व वरच्या मजल्यावरील 2 लाकडे कपाटे फोडून आतील सोन्या-चांदीचे सुमारे 4 लाख 54 हजाराचे दागिने व रोख 20 हजार रूपयांची रक्कम लांबवली. कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते. घराचे मागचे दारही उघडे होते. यावरून चोरटय़ांनी घराच्या मागच्या दाराने पोबारा केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान पोलिसांनी तत्काळ श्वानपथक व ठसे तज्ञांनाही पाचारण केले असून सायंकाळी उशीरा दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाच्या विरोधात भा.दं.वि. कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष वालावलकर करत आहेत. सोमवार व मंगळवार 2 दिवस घर बंद असल्याने नेमकी चोरी कधी झाली, या बाबतही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी लगतच असलेल्या नवजीवन हायस्कूलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. तसेच तर सायंकाळी उशीरा दाखल झालेल्या श्वानपथकाने काढलेल्या मागावरूनही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.









