वेळापत्रक बिघडलेलेच, वर्षभरातच पुनरागमन , गंगाक्षेत्रावरील चौदाही कुंडे तुडुंब
वार्ताहर/ राजापूर
राजापूरातील उन्हाळे येथील सुप्रसिद्ध गंगामाईचे बुधवारी सकाळी आगमन झाले. गतवर्षीप्रमाणेही यंदाही एप्रिल महिन्यातच गंगामाई अवतरली आहे. गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले असून काशीकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्राsत सुरू झाला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांना गंगास्नानाच्या पर्वणीवर तुर्तास तरी पाणी सोडावे लागणार आहे.
सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते व जवळपास तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा प्रघात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त तिच्या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खुपच लांबला होता. यावेळी वर्षाच्या आतच गंगामाईचे आगमन झाले आहे.
बुधवारी सकाळी गावातील ग्रामस्थ गंगाक्षेत्री गेले असता गंगेचे आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरली होती. सर्वात मोठे काशिकुंड पूर्ण भरल्याने गोमुखातून पाणी वाहत होते. मुळ गंगेचा प्रवाह मोठय़ा स्वरूपात वाहत होता.
तीन वर्षानी अवतरणाऱया गंगेच्या गेल्या काही वर्षात आगमन निर्गमनाच्या वेळेत आमुग्राल बदल झाला आहे. यापूर्वी 10 फेब्रुवारी 2011 रोजी गंगामाईचे आगमन तर 5 जून 2011 रोजी निर्गमन झाले होते. त्यानंतर जेमतेम 10 महिन्यांच्या कालावधीनंतर 11 एप्रिल 2012 रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर .23 मार्च 2013 रोजी गंगामाईचे आगमन झाले. यावेळी जवळपास सप्टेंबर 2014 पर्यंत गंगामाई प्रवाहीत होती. गंगामाईचे निर्गमन होऊन सात ते आठ महिन्याचा कालावधी लोटला असतानाच पुन्हा 27 जुलै 2015 रोजी गंगामाईचे आगमन झाले तर 16 फेब्रुवारी 2016 रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते.
अवघ्या सहा महिन्यातच म्हणजे 31 ऑगस्ट 2016 रोजी भर पावसात पून्हा गंगामाई प्रकट झाली होती. त्यानंतर 7 मे 2017 रोजी आगमन झाले होते. ती 19 जून रोजी अंतर्धान पावली होती. आणि त्याच वर्षी 6 डिसेंबर 2017 आगमन झाले होते तर 20 मार्च 2018 रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर पून्हा 7 जुलै 2018 रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. तर सुमारे 133 दिवसांनी नोव्हेंबर महिन्यात गंगामाई अंतर्धान पावली होती.
गतवर्षी 25 एप्रिल मध्ये गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर आता वर्षभराच्या आत गंगामाईचे आगमन झाल्याने गंगा भक्तांना सुखद धक्का बसला आहे. सद्यस्थितीत मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, नर्मदाकुंड, गोदावरी कुंड, चंद्रभागा कुंड, बाणकुंड, सरस्वती कुंड, कावेरीकुंड, भिमाकुंड पाण्याने भरली असून काशीकुंडातील पाणी गोमुखातून वाहण्यास सुरूवात झाली आहे. सध्या देशासह राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना गंगामाईचे आगमन झाल्याने भक्तांना पवित्र स्नानापासून वंचित रहावे लागणार आहे.









