बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे लोकोत्तर शिक्षक ः विद्यापीठ हायस्कूलरूपीज्ञानवृक्षाचे निर्माते
संजीव खाडे/कोल्हापूर
20 व्या शतकाच्या प्रारंभीच्या दुसऱया दशकातील गोष्ट आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या मनात बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी कोल्हापुरात एक शैक्षणिक संस्था सुरू करण्याचे विचार सुरू होते. त्यासाठी ते युवकांचा शोध घेत होते. त्यांना गंगाधर मोरेश्वर दीक्षित आणि वासुदेव दत्तात्रय तोफखाने नावाचे दोन युवक मिळाले. पुढे हेच दोघे निस्सिम त्याग आणि ज्ञानदानातील अतुलनीय योगदानामुळे दीक्षित गुरूजी आणि तोफखाने मास्तर म्हणून परिचित झाले. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या ऊर्जेतून त्यांनी भक्ती ईश्वराची… सेवा मानवाची हे ब्रीद सत्यात उतरविताना भक्ती-सेवा विद्यापीठ हायस्कूलच्या रोपटÎातून ज्ञानवृक्ष साकारला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आजच्या शिक्षकाचा गौरव होईल. पण लोकोत्तर शिक्षक बनून बहुजन समाजाला ज्ञानमार्गाकडे जाण्याची दिशा दाखविणाऱया दीक्षित गुरूजी, तोफखाने मास्तरना विसरता येणार नाही. दीक्षित गुरूजींचा जन्म 9 एप्रिल 1888 चा तर निधन 17 डिसेंबर 1980 रोजीचे. तोफखाने मास्तर 28 मार्च 1888 रोजी जन्मले तर त्यांचे निधन 27 फेब्रुवारी 1967 रोजी झाले. दीक्षित गुरूजींना दीर्घायुष्य लाभले. विद्यापीठ हायस्कूलच्या स्थापनेवेळी अंबाबाई मंदिरजवळील सकवारबाईची थट्टी म्हणून प्रसिद्ध असणारी इमारत शाहू महाराजांनी शाळेसाठी दिली. 3 सप्टेंबर 1917 रोजी विद्यापीठ हायस्कूलरूपी रोपटे लावले. स्थापनेवेळी तपोवनच्या माळावरील 33 एकर जागा शाहू महाराजांनी दीक्षित गुरूजींच्या नावावर केली. पुढे ती त्यांनी विद्यापीठ सोसायटीला समर्पित केली. पैलवानकी केलेल्या दीक्षित गुरूजींनी विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लावली. विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजही सूर्यनमस्कार संकल्पना राबविली जाते, ती दीक्षित गुरूजींचीच संकल्पना आहे. गणित हा त्यांचा विषय. सेवा, स्वाध्याय, स्वावलंबन, साधी राहणी ही चुतःसुत्री जपली. पण या लोकोत्तर शिक्षकाने आयुष्यभर ब्रह्मचर्य जपताना कल्पक प्रयोगही केले. आश्रमशाळा, गुरूकुल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी वसतिगृह ही त्यांचीच देण.
तोफखाने मास्तर हे थिऑसॉफिकल (विश्वबंधुत्वाचा विचार) सोसायटीचे कोल्हापुरातील तत्कालिन प्रर्वतक. त्यांचे वडील शाहू महाराजाच्या दरबारात अधिकारी होते. छत्रपती घराण्याचे विश्वासू म्हणून तोफखाने घराण्याची ओळख. वास्तविक वासुदेव तोफखाने यांना थिऑसॉफिकल सोसायटीने कलकत्याला (आताचा कोलकाता) बोलविले होते. पण शाहू महाराजांनी त्यांना जाण्यापासून रोखले. कोल्हापुरच्या शैक्षणिक विकासासाठी तोफखाने हवेतच म्हणून महाराजांचा आग्रह होता. त्यांच्या रूपाने उच्च विद्याविभूषित, तत्वज्ञानाचा अभ्यासक विद्यापीठ हायस्कूलला लाभला. दीक्षित आणि तोफखाने यांच्या जोडीने विद्यापीठ हायस्कूलचा ज्ञानरूपी वृटवृक्ष उभा केला. मुलां-मुलींना एकत्रित शिक्षण देण्याची संकल्पनाही त्यांनी प्रथम राबविली. गेल्या शंभरहून अधिक वर्षात या शाळेने देशविदेशात लौकिक मिळविणारे हजारो विद्यार्थी देशाला दिले. सामाजिक चळवळीतून समतेच्या विचाराचा आग्रह धरताना बहुजन समाजासाठी शिक्षणाचा स्त्राsत खुला करणारे राजर्षी शाहू महाराज लोकोत्तर समाज शिक्षकही होते. त्यांच्या विश्वासाला दीक्षित गुरूजी आणि तोफखाने मास्तर जागले.









