सातारा:
गेली दोन महिने सातारकरांनी लॉकडाऊन पाळून तसे कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱया चरणात राजधानी कोरोनाने हळूच पुन्हा प्रवेश केला. त्यात स्थानिक सातारकरांचा सहभाग नसला तरी अत्यावश्यक सुविधा सुरु करण्यासाठी नागरिकांचा दबाव वाढत होता. शेवटी प्रशासनाने मायक्रो कंटेन्मेट झोन करुन अत्यावश्यक सेवा सुरु केल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढत असतानाच आता दारु दुकानेही बुधवारपासून सुरु झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जाच उडणार आहे. गर्दीमुळे राजधानी पळू लागली असली तरी कोरोना संसर्गाची धास्ती वाढली आहे.
सातारा शहर परिसरात पहिला रुग्ण आढळून आला. तो कॅलिफोर्नियावरुन आला होता. दुर्देवाने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येवून देखील त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. मात्र, त्याच्यानंतर सातारा तालुका व शहरात कोरोना बाधित आढळून येत नसला तरी प्रशासनाच्या सुचनांनुसार नागरिक लॉकडाऊन पाळत होते. मात्र, अचानक दोन आरोग्य कर्मचारी महिला पॉझिटिव्ह आढळल्या तर लगेच जिल्हा कारागृहातील 9 कैदी बाधित समोर आले. तर कोडोली, प्रतापगंज पेठ, अर्कशाळानगर, रविवार पेठेत रुग्ण आढळून आले. मात्र त्या त्या नवीन नियमांनुसार मायक्रो कंटेन्मेंट झोन असल्याने त्या परिसरातील हालचालींना मनाई करण्यात आलेली आहे.
तर दुसरीकडे कंटेन्मेंट झोन वगळता साताऱयातील किराणा माल, दूध, भाजीपाला, रेशनिंग दुकाने, बांधकामाशी संबंधित दुकाने, चिकन, मटण दुकानांसह दारु दुकानेही सुरु झाल्याने राजधानीत होणारी गर्दी धास्ती वाढवू लागली आहे. त्यातच पुणे व मुंबईवरुन येणाऱया नागरिकांमधून बाधित समोर येत असल्याने त्यांचे आव्हान पेलावे लागणार आहे. एकूणच या सर्व वातावरणात होत असलेली गर्दी संसर्ग तर वाढवणार नाही ना? अशी भितीही नागरिकांमध्ये असली तरी शिस्त पाळण्यास मात्र कोणीही तयार नाही.
सातारा शहर व परिसर कोरोनामुक्त करुन ग्रीन झोनमध्ये जायचे असेल तर प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. त्यामुळे जरी दुकाने सुरु झाली असली तिथे होणारी गर्दी टाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र सातारकर गंभीर दिसत नसल्याने कोरोना संसर्गाच्या वाढू शकणाऱया स्थितीची धास्तीही नागरिकांमध्ये दिसून येत असली तरी सातारा पूर्वपदावर येवू लागला असून लॉकडाऊन नावापुरता राहिल्याचे चित्र आजमितीस सातारकर अनुभवत आहेत.









