शुक्रवारी 20 बाधितांसह रुग्णसंख्या पोहोचली 200 वर
प्रतिनिधी/ पणजी
राजधानीत कोरोनाचा कहर सुरु असून शुक्रवारी 20 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राजधानीतील रुग्णसंख्या 200वर पोहोचली असून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरु लागली आहे. पणजीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. आधी प्रतिदिनी सरासरी 6-7 रुग्ण सापडायचे. आता रोज 20 पेक्षा जास्त मिळू लागले आहेत. त्यामुळे पणजी कोरोनाच्या विळख्यात गुरफटू लागली आहे यात शंका नाही.
दरवेळा महानगरपालिकेतर्फे योग्य ती काळजी घेऊन देखील पणजीतील रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
शुक्रवारी पणजीत सापडलेल्या 20 रुग्णांपैकी आल्तिनो जीआरपी क्वॉटर्स येथे 4, क्राऊन हॉटेलजवळ 3, भाटले धनलक्ष्मी इमारत परिसर 2, रायबंदर येथे 5, सांतईनेझ येथील सरकारी वसाहतीत 2, सांतईनेझ येथील अनुपमा अर्पाटमेंट, करझांळे, कांपाल व मिरामार येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या सर्व भागात त्वरित सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन
गुरुवारी अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी मिळालेल्या रुग्णांच्या ठिकाणी शनिवारी सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत मळा, भाटले, रायबंदर, आल्तिनो, कांपाल, मिरामार, सांतईनेझ, टोंक, दोनापावला तसेच अनेक सरकारी खात्यात व वसाहतीत मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. पालिका या भागावर लक्ष ठेवून आहे. तसेच सॅनिटायझेसन देखील या भागामध्ये अनेकदा करण्यात आले आहे, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.









