शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने दिलेल्या नोटीस वरून महाराष्ट्रात सोमवारी थोडीशी खळबळ माजली. दोन्ही बाजूच्या आरोप-प्रत्यारोपावरून काही काळ चर्चा झाली. आता पुढच्या एपिसोडची जनतेला प्रतीक्षा आहे. राज्याचे राजकारण टीव्ही मालिकांसारखे झाले आहे. काही काळ एका ट्रकवर स्टोरी धावू लागते आणि विषयाचा चोथा झाला की ट्रक बदलते. गेल्या वर्षभरात महा विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील प्रत्येक घटकाने जनतेचे जेवढे मनोरंजन केले तेवढे कुठल्याही चॅनेलवरील मालिकेने झाले नाही. नवरसांनी भरलेले असे राजकारण आणि त्यांचे दशावतार ही राजकारणी मंडळी तळमळीने दाखवत आहेत. राजकारणी कमी असतात म्हणून की काय सिनेमा क्षेत्रातील गाजलेल्या नट-नटय़ांना सुद्धा अचानक वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळते. वानप्रस्थाश्रमातील एखादे आजोबासुद्धा अचानक लुडबुड करत राहतात. या साऱया खेळाचा सूत्रधार कोठेतरी दूर असावा या मतावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीश्वर अधिकाऱयांच्या आणि यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या राजकीय मंचावरील सूत्रे हलवत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेली एक नैतिक आणि उच्च प्रतीच्या राजकारणाची पूर्वपीठिका पूर्णतः दडपून टाकत नवा ’चार पैशांचा तमाशा’ महाराष्ट्रात रंगला आहे. जनतेने तो किती काळ सहन करावा हा प्रश्नच आहे. लौकिकाला साजेसा खेळ या राजकारण्यांकडून खेळला जात आहे आणि त्यातून त्यांची संस्कृतीच उघडी पडत आहे. राज्यातली सत्ता हातून निसटली आणि काही करून पुन्हा हातात येत नाही म्हणून केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या तीन यंत्रणांना आपले शस्त्र बनवले आहे, हे काही लपून राहिलेले नाही. 2014 साली भाजपला काठावर मिळालेली सत्ता राष्ट्रवादीकडून उलथवली जाऊ नये म्हणून छगन भुजबळ यांना जेलमध्ये टाकण्यात आले. अजित पवार आणि त्यांच्या निकटच्या सहकारी मंत्र्यांचे चौकशीचे सत्र संपूर्ण पाच वर्षे चालवले आणि पुढच्या सत्तेला मदत करण्याच्या हमीवर पहाटेचा शपथविधी उरकताच त्यांना क्लीन चिट दिली गेली. विधानसभा निवडणुकीत पवारांचा अडथळा ठरेल हे लक्षात घेऊन त्यांना ऐन निवडणुकीत नोटीस देण्यात आली. अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर खात्याची नोटीस देण्यात आली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मित्राला एमएमआरडीएमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट मिळवून दिले का आणि त्यामध्ये काही अफरातफर झाली आहे का अशा संशयावरून प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू करण्यात आली. त्यांच्या पाठोपाठ नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजपचे जुने नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली. पाठोपाठ दहा वर्षापूर्वी घेतलेले पन्नास लाख रुपयांचे कर्ज आणि मैत्रिणीकडून घेतलेल्या दहा लाख उधारीची चौकशी करण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपवर आगपाखड केली. बायकांच्या पदराआड लपून राजकारण करू नका इथपासून सोळाशे पटींनी ज्या भाजप नेत्यांची संपत्ती वाढली त्यांची चौकशी ईडी कधी करणार आहे असा प्रश्न करत भाजप नेत्यांच्या मुलाबाळांची संपत्ती किती आणि कशी वाढली याची सारी माहिती आमच्याकडे आहे, आम्ही तोंड उघडले तर भाजपची पळता भुई थोडी होईल असा दमही राऊत यांनी भरला. भाजपला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे आहे, तुम्ही आडवे येऊ नका अशी धमकी भाजपच्या काही नेत्यांनी दिली होती आणि कोणाला नोटीस जाणार त्याची यादी दाखवली होती. त्यानुसारच कारवाई सुरू आहे असा त्यांनी ईडीवर आरोप केला आहे. आरोपाचे एकवेळ समजून घेता येईल. पण ईडीच्या कार्यालयावर भाजप प्रदेश कार्यालय असा फलक झळकावणे क्षम्य मानता येणार नाही. राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले ते आरोप न्यायालयातही करू शकले असते, भाजप नेत्यांची यादी सादर करुन न्यायालयाच्या आदेशाने चौकशी लावू शकले असते आणि ईडीच्या कार्यवाहीवर अंकुशही आणू शकले असते, पण उद्धव ठाकरे शिवसेनेची पूर्वीची प्रतिमा बदलायला निघाले असताना पुन्हा त्याच टप्प्यावर शिवसेनेला राऊतांनी आणून ठेवले आहे. ठोशास ठोसा म्हणून हे एक वेळ लोकांना कौतुकाचे वाटले तरी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कार्यालयावर शिवसेना भवन असा फलक सेनेला चालू शकेल का याचा राऊत यांच्यासारख्या संपादकांनी तारतम्याने विचार करायला हवा. भाजप नेते ऍड. आशिष शेलार वकिलीत पटाईत असल्याने त्यांनी राऊत यांच्या आरोपांना ’डराव डराव’ ठरवले. कर नसेल तर डर कशाला? दाम दमडीचा हिशोब देऊन निर्दोषत्व सिद्ध करा. सीबीआय ईडीवर दबाव टाकण्याचे काम शिवसेना सातत्याने करीत असून त्यामुळे या संस्थांचे पावित्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही अशी भीतीही शेलार यांनी व्यक्त केली आहे. या विधानाने महाराष्ट्रात चिंता व्यक्त होण्याऐवजी हास्यसम्राट कार्यक्रम आपण पहात आहोत असेच लोकांना वाटले असेल. महाराष्ट्रातील राजकारणी हा जो काही खेळ करत आहेत, त्याच्याने लोकांच्या मनावर काही वेगळा प्रभाव पडेल असे त्यांना वाटत असले तरी या राज्यातील जनता दूधखुळी नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे. गाजलेल्या अनेक लोकप्रिय मालिकांना नंतर नंतर प्रेक्षक मिळेनासा झाला असे अनेकांच्या या बाबतीत घडले आहे. तेव्हा आपला खेळ फार लोकप्रिय होत आहे आणि डेली सोपमध्ये आपले नाव चमकते आहे अशा अविर्भावात जर महाराष्ट्राचे सर्वपक्षीय नेते असेच राहिले तर पुढच्या वेळी राजकारण याहून अधिक बिकट होईल आणि जनतेने टाकलेले गुंते सोडवता सोडवता आपले पुरते वस्त्रहरण होईल याचे भान नेतेमंडळींनी ठेवलेले बरे.
Previous Articleकाय आले, काय गेले (1)
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








