डेडस्टॉकमधील पाणी 50 एचपी वीजपंपाद्वारे उपसा करण्यास सुरुवात : किमान 20 ते 25 दिवस शहराला पाणी पुरणार
वार्ताहर / तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी घट निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा प्रवाह वेग कमी झाल्याने डेडस्टॉकमधील पाणी गुरुवारी सकाळपासून एका 50 हॉर्स पावरचा वीजपंप सुरू करत उपसा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
जलाशयाच्या सर्वात खालच्या पाणीपातळीने नोंद केली आहे. सकाळी पाणीपातळीही 2447-50 फूट इतकी नोंद झाल्याने प्रवाहाने जलाशयाकडील जॅकवेलमध्ये पाणी वाहण्याचा वेग मंदावला. त्यामुळे मोटरीने पाणी सरळ बंधाऱ्याखालील बाजूस असलेल्या लिफ्टवेलमध्ये फिनिक्स पाईपलाईनद्वारे टाकण्यात आले आहे. आणखी एका मोटरीने पाणी उपसा करण्यासाठी वीजपंप पाण्यात टाकण्यात आला आहे.
डेडस्टॉकमधील जलाशय बंधाऱ्याशेजारील जागेतील पाणीपातळी अजूनही किमान 15 ते 20 फूट आहे. या पाण्याचा वापर करण्यासाठी किमान आणखी दोन वीजपंपांची गरज आहे. या डेडस्टॉकमधील पाणी किमान 20 ते 25 दिवस शहराला पुरणारे आहे. 2019 साली जलाशयाच्या डेडस्टॉकमधील सहा फूट पाणी विद्युतपंपाद्वारे उपसा करत शहराला पुरवठा करण्यात आले होते. सर्वात खालची पाणीपातळी 29-06-2019 रोजी 2442 फुटापर्यंत गेली होती.
तिसरे जॅकवेल होल उघडे
जलाशयातील पाणी हे येथील जॅकवेलमध्ये जाते. त्यापुढे ते लिफ्टवेलमध्ये जाते व त्यातून पुढे हिंडलगा पंपगृहापर्यंत प्रवाहाने जाते. पाण्याचा दाब जादा तेवढे पाणी वेगाने जाते. एकूण तीन होल जॅकवेलला आहेत. 2448, 2456 व 2465 फुटावरील पाणीपातळीला आहेत. पाण्याच्या दाबाला पाहून याचे व्हॉल्व खुले केले जातात. सर्वात शेवटचा 2448 फुटावरील होल उघडा पडल्याने पाण्याचा दाब कमी झाला आहे. मार्कंडेय नदी पात्र उगमस्थळापासून कोरडे पडले आहे.
जलाशयाला तलावाचे स्वरूप
जलाशयातील पाणीपातळी कमी झाल्याने एका छोट्या तलावाचे स्वरूप जलाशयाला आले आहे. आजपर्यंत जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने कर्नाटक शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. यापुढे तरी कर्नाटक शासन पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न करतेय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.









