प्रतिनिधी/ पणजी
राजधानी पणजीत सर्वत्र खोदकामे सुरू आहेत. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर मातीचे ढिगारे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या खोदाखोदीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन वाहतूक केंडी होत आहे. पणजी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
डिसेंबरपर्यंत पणजीतील खोदकामे बंद होतील असे मनपाने जाहीर केले होते, मात्र पुढील पंधरा दिवस ही खोदकामे चालू राहतील अशीच स्थीती आहे. राजधानीतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खोदकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेले काही दिवस खोदण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगारे पडून आहेत. यामुळे सर्वत्र धुळीचे सम्राज्य पसरले आहे. राजधानीचे पूर्ण विद्रुपीकरण झाले आहे. कंत्राटदारांनी खड्डे खोदून ठेवलेले आहेत. अनेक ठिकाणी मागील काही दिवस हे खड्डे उघडेच आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
या खोदकामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर रस्त्यांच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये धूळ जात असल्याने व्यापाऱयांचे नुकसान होत आहे. हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर खोदकाम केलेल्या सर्वच रस्त्यांवर पार्किंगची सुविधा आहे. त्यामुळे वाहन पार्किंगची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मनपाची आज बैठक
या खोदकाम प्रकरणी पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी आज गुरुवारी बैठक बालाविली आहे.









