प्रतिनिधी/ बेळगाव
एकवेळ कोरोनाशी आम्ही लढा देऊ पण रस्ते अडवणुकीबरोबर लढून आमची सहनशीलता संपुष्टात आली आहे. अशी भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. गेल्या दोन वर्षापासून बेळगावकर सतत रस्ते बदलाच्या, अरूंद रस्त्यांच्या आणि अचानक बदलले गेलेल्या मार्गाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोविड- 19 ची भर पडली आहे. आणि एकूणच बेळगावकरांची सध्या सत्व परिक्षाच पाहिली जात आहे.
बेळगावचे नाव स्मार्ट सिटीच्या यादीत सहभागी झाले तेव्हा बेळगावकरांना आनंद झाला होता. परंतु जसे स्मार्ट सिटीच्या कामाला सुरूवात झाली तसे त्यांच्या समस्यांनाही सुरूवात झाली. शहरात खोदला गेला नाही असा एकही भाग नाही. आणि संपूर्ण रस्ता पक्का झाला आहे असा एकही रस्ता नाही. तक्रार करणाऱया, निवेदने देणाऱया नागरिकांना प्रशासनाने सातत्याने सहा महिने कळ काढा असे सांगूण वाटाण्याच्या अक्षता दिल्या. परंतु एकूणच प्रशासनाचे काम आणि सहा महिने थांब याचे प्रत्यंतर नागरिकांना सातत्याने येत राहिले.
दरम्यान स्मार्ट सिटीचे काम लवकर होईल अशा अपेक्षेत असणाऱया नागरिकांना कोरोनाने मोठा धक्का दिला. त्यामुळे लॉकडाऊन, सीलडाऊन यांना बेळगावकरांना सामोरे जावे लागले. पहिल्या लॉकडाऊनला देशातील सर्वच नागरिकांनी प्रतिसाद दिला व काटेकोरपणे त्याचे पालन केले. दुसरा लॉकडाऊन त्रासदायक होता. तरीही बेळगावकरांनी सहन केला. मात्र या कालावधीत स्मार्ट सिटीचे कामही थांबले.
मात्र एकूणच स्मार्ट सिटीचे काम हे कासवगतीनेच सुरू आहे. या कामासाठी रस्ते बंद केले जातात. दुसरीकडे कोरोना बाधीत व्यक्ती आढळली की तो परिसर सीलडाऊन केला जातो. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहेत. अचानक मार्ग बदलले की नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण होतो. जो-तो आपले वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न करता. परिणामी सर्वत्र वाहतूक कोंडी होते. या वाहतुक कोंडीमध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक, पत्रकारही अडकून पडतात. डॉक्टरांना वेळेवर हॉस्पिटल आणि दवाखान्यात पोहोचण्यात अडचण येते.
ज्यांना तातडीने कामासाठी पोहोचायचे असते त्यांची गैरसोय होतेच. परंतु तरूणाई अशा वाहतुक कोंडीमध्ये वनवेमधून किंवा चुकीच्या दिशेने वाहन दामटते त्यामुळे अपघाताची शक्मयता वाढते आहे. पोलीसांचे वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने तरूणाईचे फावते आहे.
अशाच वाहतुक कोंडीमध्ये रूग्णवाहिकेला सुद्धा रस्ता मिळत नाही आणि वाहिकेमधील रूग्णाला उपचार मिळण्यास विलंब होतो. नागरिकांना रूग्णवाहिकेला रस्ता दिला पाहिजे हे समजते पण तो देणार कसा हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. सीलडाऊन करण्याबाबत पोलीस किंवा प्रशासन कोणतीही सूचना देत नाहीत. बॅरिकेड्स लावून पोलीस मोकळे होतात. परंतु त्याच बॅरिकेड्सवर सीलडाऊनचा कालावधी, परिसराची मर्यादा, याच्या सूचना लावल्यास नागरिकांची गैरसोय टळू शकते.
सीलडाऊनला आता नागरिक वैतागले आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झालेच आहे. जे काही चार पैसे मिळण्याची शक्मयता आहे. ती या सीलडाऊनमुळे धुसर होत चालली आहे. कधी रस्ता दुरूस्ती, कधी झाडाच्या फांद्या तोडणे, कधी विजखांब बदलणे अशा कारणास्तव तर कधी सीलडाऊनमुळे या शहरात सतत रस्ते बंद करण्याचे सत्र सुरू आहे. त्यापेक्षा लॉकडाऊनच करा आणि एकदाची कामे पूर्ण करून घ्या. म्हणजे भविष्यात कधी ना कधी बेळगावच्या उत्कृ÷ दर्जाच्या रस्त्यावरून मनाजोगते फिरता येईल, असे नागरिक म्हणत आहेत.
मार्ग लांबले की पेट्रोलचाही अधिक खर्च
सतत मार्ग बदल झाल्याने दुरवरचा हेलपाटा घालत वाहनधारकांना यावे लागत आहे. मार्ग लांबले की पेट्रोलही अधिक खर्च होते. पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. जे मुळातच परवडणारे नाहीत. त्यात प्रशासनाच्या सुनियोजितपणाच्या अभावामुळे खर्चातच भर पडली आहे. याची प्रशासन, पोलीस व महानगरपालिका नोंद घेऊन नागरिकांचे हाल कमी करणार का? हा प्रश्न.