प्रतिनिधी/ बेळगाव
बुडा कार्यालयाची माहिती नागरिकांना मिळावी याकरिता राष्ट्रीय महामार्गाजवळ बुडा कार्यालयाकडे जाणाऱया रस्त्यावर स्वागत कमान उभारण्यात आली होती. मात्र, सदर स्वागत कमान खराब झाल्याने कोसळली असून, लॉकडाऊन काळात या कमानीचा वापर रस्ता बंद करण्यासाठी करण्यात आला आहे.
बुडा कार्यालयाची हद्द समजण्यासाठी तसेच कार्यालयाची माहिती मिळावी याकरिता ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय बुडाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या कमानीचा उपयोग होणार का, याचा विचार केला गेला नाही. केलेल्या ठरावानुसार शहराच्या विविध भागात कमानींची उभारणी करण्यात आली. बुडा कार्यालयाकडे जाणाऱया रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाशेजारी मोठी स्वागत कमान उभारण्यात आली. याकरिता दोन लाखाचा खर्च करण्यात आला होता. पण काही वर्षातच ही कमान मोडकळीस आली असून, पूर्णपणे कोसळली आहे. ही स्वागत कमान कोसळल्याने बाजूला ठेवण्यात आली होती. पण सदर कमान पुन्हा बसविण्याच्यादृष्टीने बुडाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याशेजारी कमानीचा साचा पडून होता. मात्र, लॉकडाऊन काळात या कमानीचा उपयोग पोलीस प्रशासनाने केला आहे. बुडा कार्यालयाकडे तसेच परिसरातील वसाहतींकडे जाणारी वाहतूक अडविण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. याकरिता सदर स्वागत कमान आडवी टाकून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. या कमानीची उभारणी करण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यासाठी या कमानीचा उपयोग झाला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.









