तुर्कस्तानच्या ड्रोनने युक्रेन घडवून आणतोय विध्वंस
रशियाच्या विरोधात युक्रेन तुर्कस्तानचा धोकादायक लढाऊ ड्रोन बेयरेकतार टीबी-2चा देखील वापर करत आहे. या ड्रोनच्या मदतीने युक्रेनने रशियाच्या तेलाने भरलेली पूर्ण रेल्वेगाडीच उद्ध्वस्त केली आहे. ही रेल्वे रशियाच्या सैन्याला इंधनाचा पुरवठा करण्यासाठी जात होती. तसेच या ड्रोनद्वारे खार्कीव्हनजीक रशियाच्या सैन्याचा एक तळ नष्ट करण्यात आला आहे. युक्रेनच्या सैन्याने ड्रोनच्या वापराचे फुटेज जारी केले आहेत.
युक्रेनने 2019 मध्ये तुर्कस्तानकडून हे ड्रोन्स खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या ड्रोन्सचा वापर रशियाच्या सैन्याच्या विरोधात करत असल्याची कबुली युक्रेनने दिली आहे. तर रशियाच्या वृत्तसंस्थांनी अनेक टीबी-2 ड्रोन पाडविल्याचा दावा केला आहे.
रशियाकडे सुमारे 2840 रणगाडे असून युक्रेन विरोधात त्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतोय. युक्रेनकडे किती बेयरेकतार ड्रोन आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु जुलै 2019 मध्ये युक्रेनने 6 ड्रोन्स खरेदी करण्याचा करार केला होता, त्यानंतर ही संख्या 24 करण्यात आली होती. युक्रेनने तुर्कस्तानसोबत या ड्रोन्सच्या निर्मितीसाठी देखील करार केला आहे. युक्रेनकडे सध्या 20 ड्रोन्स असू शकतात असे सैन्य विश्लेषकांचे मानणे आहे.









