मागील सात महिने जगभर खळबळ माजविलेल्या कोरोनावर मात करणारे निर्णायक व परिणामकारक औषध शोधण्यात होणारा विलंब हा या व्याधीची धास्ती आणि परिणाम दिवसेंदिवस वाढवणारा ठरत होता. अशा स्थितीत इंग्लंड, अमेरिका, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, इस्रायल आणि इतर देश कोविड-19 वर परिणामकारक लस शोधण्याच्या कामात निमग्न होते. दरम्यानच्या काळात प्राथमिक खबरदारीसह नानाविध देशी-विदेशी औषधे कोरोना हटवू शकतात अशा बातम्या व समजुतीही पुढे येत होत्या. मात्र, यासंदर्भात हे औषध किंवा ही लस यावर रामबाण आहे, याची खात्री कोठूनच मिळत नव्हती. संकटकाळात माणूस प्रयत्नही करतो आणि आशेवरही जगतो. त्यामुळे असे होणे स्वाभाविक होते. खरेतर वाढत जाणाऱया या साथीवर आणि संशोधनांवर जागतिक आरोग्य संघटनेचे नियंत्रण असणे अपेक्षित होते. सहा भौगोलिक प्रदेशात आणि 150 देशात कार्यालये असलेल्या या संघटनेकडे या व्याधीच्या प्रसारावर अंकुश, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जागतिक स्तरावर व्यवस्थापन, संशोधनास चालना अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱया होत्या. परंतु, चीनमधील कोरोना लागणीचे पहिले उदाहरण पुढे येऊन त्यानंतरचा झपाटय़ाने होत असलेला प्रसार बीजिंगमध्ये कार्यालय असूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या नजरेस आला नाही. त्यानंतर शेजारील तैवान, जपान, द. कोरिया येथे झालेला व्याधीचा प्रसार, तैवानच्या माणसा-माणसात तात्काळ लागण होणाऱया या व्याधीच्या इशाऱयाकडे दुर्लक्ष, तब्बल 30 जानेवारीस ही महामारी जागतिक आणीबाणी आहे, हे जाहीर करणे, त्याही पुढे चीनची या व्याधीवर मात करणारा देश म्हणून तोंडभर स्तुती करणे अशा प्रकारातून या संघटनेने आपली अकार्यक्षमताच सिद्ध केली. 2014 मध्ये इबोला साथीचा प्रसार रोखण्याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेची हीच अकार्यक्षमता पुढे आली होती. आताही कोरोनावरील लसीबाबत विविध देशांकडून विविध दावे पुढे येत असताना लसीबाबतची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत या संघटनेकडून तपशीलवार माहिती आणि कोणतीच निश्चितता दिसून येत नाही.
काही दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड इन्स्टिटय़ूटने संशोधनातून निर्माण केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या असल्याचे वृत्त होते. या तिसऱया टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतरच्या माहिती व सर्वेक्षणावर आधारित अहवालानंतर या लसीची परिणामकारकता सिद्ध होऊन तिच्या निर्मितीस चालना मिळणार आहे. इतर काही देशातील संशोधनही प्रगतीपथावर आहे. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी रशियन संशोधकांनी कोविड-19 प्रतिबंधक लस बनवल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर या लसीचे नाव ‘स्पुटनिक-5’ असे ठेवून ती आरंभी रशियातील नागरिकांसाठी वापरात आणली जाईल असे वृत्त रशियन सूत्रांकडून प्रसारित करण्यात आले आहे. याबाबत तज्ञांचे मत असे आहे, की ‘रशियन संशोधकांनी तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी सूत्र सर्वस्वी डावलून आपल्यावरच या लसीची चाचणी घेतली आहे. यानंतर ती थेट वापरात आणली तर त्याचे जे काही इतर दुष्परिणाम असतील त्यांना रशियन नागरिक आणि इतरांनाही सामोरे जावे लागेल’. अर्थात, रशियन संशोधन आणि अंमल प्रणालीशी जे परिचित आहेत त्यांना हा इतिहास माहीत आहे, की रशियन संशोधकांची पूर्वापार ही परंपराच आहे की ते आजारावरील कोणत्याही नव्या लसीचा एकदा त्यांना तीबद्दल विश्वासार्हता मिळाली की स्वत:वरच प्रयोग करतात. शिवाय स्वत:च्या अपत्यांवरही तो प्रयोग करतात आणि त्यातून निष्कर्ष काढून मग त्या लसीचा प्रसार लोकांत करतात. यानुसार पुतिन या परंपरेस जागून स्वत:च्या मुलीवरच या लसीचा प्रयोग झाल्याचे सांगत आहेत. बुधवारी रशियन अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येत्या दोन आठवडय़ानंतर काही आरोग्य सेवकांसाठी ही लस उपलब्ध होईल. या लसीबाबतचे सुरक्षितताविषयक आक्षेप निराधार आहेत आणि लसीच्या परिणामकारकतेविषयी आम्ही निश्चिंत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर रशियाच्या या संशोधनाबाबत जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. इस्रायलच्या आरोग्यमंत्र्यांनी आपला देश या रशियन लसीचे परीक्षण करून ती खरोखरच दर्जेदार असेल तर रशियन सरकारशी वाटाघाटी करून लसीच्या खरेदीबाबत निर्णय घेईल, असे म्हटले आहे. याचबरोबर फिलिपाईन्स, ब्राझिल, कझाकीस्तान या देशांनी रशियाशी चर्चा करण्यात स्वारस्य दाखविले आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादी देशांनी मात्र या संशोधनाच्या परिपूर्णतेबाबत शंका व्यक्त करून रशियावर एकतर्फी कार्यवाहीबाबत टीका केली आहे. एकंदरीत कोरोनाचा जागतिक प्रादुर्भाव आणि त्याची उपद्रव क्षमता पाहता या सर्वव्यापी आपत्तीवर जागतिक वैज्ञानिक समूह एकत्र येऊन निर्णय का घेत नाही, असा प्रश्न पडावा. कोरोनाची आपत्ती ही वैश्विक आपत्ती असताना आणि या आपत्तीतून कोणताच देश सुटलेला नसताना अशा जीवन-मरणाच्या विषयावरही श्रेयवादाची लढाई होणे हे खरोखरीच अशोभनीय आणि दुर्दैवी आहे.
चीन आणि इतर देशांच्या अशाच निंदनीय बेपर्वाईमुळे आणि अविश्वसनीय वर्तणुकीमुळे कोरोनाने जागतिक आपत्तीचे स्वरुप धारण केले आहे. या वस्तुस्थितीतून जगातील मोठी राष्ट्रे काहीच धडा घेताना दिसत नाहीत. यासंदर्भात निष्क्रिय असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या दाव्याबाबत स्पष्टीकरण देताना कोणत्याही लसीची गुणवत्ता ही व्यापक चाचण्या, प्रस्तावित तीन टप्प्यांची यथार्थ पूर्तता आणि लसीच्या सुरक्षिततेबाबत संपूर्ण जबाबदारपूर्ण माहिती व तपशील यावर अवलंबून असते, असे म्हटले आहे. पण केवळ असे मतप्रदर्शन करून जागतिक आरोग्य संघटनेची जबाबदारी टळत नाही. स्पुटनिक-5 या कथिक कोरोना प्रतिबंधक लसीचे एकतर्फी प्रयोग रशियाने आपल्या व इतर देशात सुरू केले तर या कृतीविरोधात जागतिक आरोग्य संघटना कोणती भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे. आज परिस्थितीच अशी आहे की सारे जग कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीकडे डोळे लावून बसले आहे.
रशिया असो वा ब्रिटन कोणत्याही देशाने जरी लसीची निर्मिती केली तरी ती स्वागतार्ह घटना ठरणार आहे. पण खरा प्रश्न आहे तो अशा लसीच्या क्षमतेबद्दल जागतिक एकवाक्मयता घडून येण्याचा. यासाठीची सुबुद्धी रशिया, जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य इतर देशांना लवकरात लवकर लाभो, असेच सर्वसामान्य लोकांचे मत आहे.
अनिल आजगावकर, मोबा.9480275418








