अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीला भारताने झुगारले – एस-400 खरेदीचा मुद्दा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा खरेदी केल्यावर घोंगावत असलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांच्या धोक्यादरम्यान भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रांची खरेदी सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. भारत रशियासोबतचे स्वतःचे संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आशादायी असल्याचे उद्गार तेथील भारताचे राजदूत बालवेंकटेश वर्मा यांनी काढले आहेत. अमेरिकेकडून काट्सा अंतर्गत निर्बंध लादले जाण्याचा धोका असताना त्यांनी हे विधान केले आहे.
अमेरिकेसोबत संरक्षण संबंध वृद्धिंगत होत असले तरीही रशियासोबतची मैत्री तोडणार नाही, उलट ती अधिक बळकट करू असे भारताने स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वाढणार असल्याचे वर्मा यांनी रशियाच्या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

2021-2031 दरम्यान सैन्य आणि तांत्रिक सहकार्याची घोषणा बैठकीदरम्यान होईल. चालू वर्षी भारताच्या सैन्याने मागील 5 महिन्यांमध्ये रशियाकडून आयोजित प्रत्येक सैन्याभ्यासात भाग घेतला आहे. मोदी आणि पुतीन यांच्यात एप्रिल महिन्यात झालेल्या चर्चेत 2प्लस2 संवाद निर्माण करण्यावर सहमती झाली आहे. नवे ट्रेंड सामरिक स्थैर्याला क्षेत्रीय तसेच जागतिक स्तरावर प्रभावित करत असल्याचे वर्मा यांनी नमूद केले आहे.
निर्बंधांपासून सूट देण्याची मागणी
भारत रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा खरेदी करत असल्याने अमेरिकेच्या निर्बंधांचा धोका निर्माण झाला आहे. ही यंत्रणा चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारताला प्राप्त होणार आहे. अशा स्थितीत भारताला काट्सा निर्बंधांपासून सूट देण्याची मागणी आता अमेरिकेत जोर धरू लागली आहे. भारत रशियाकडून घातक युद्धनौका, रायफल्स आणि आण्विक संयंत्र देखील प्राप्त करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य सातत्याने वाढत आहे.
रशियावर बऱयाचअंशी निर्भर
रशियाची शस्त्रास्त्रs तसेच उपकरणांमधील भारताच्या निर्भरतेत उल्लेखनीय घट झाली आहे. पण भारतीय सैन्य रशियाकडून पुरविल्या जाणाऱया उपकरणांच्या शिवाय प्रभावीपणे कार्य करू शकत नसल्याचे अमेरिकेच्या एका अहवालात नमूद आहे. नजीकच्या भविष्यात भारताची रशियाच्या शस्त्रप्रणालींवरील निर्भरता कायम राहणार असल्याचे काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात म्हटले गेले आहे.









